विद्यार्थ्यांची उन्नती लक्षात घेवून काम केल्याने यशापूर्तीचे समाधान

सेवानिवृत्ती कार्यक्रमात मुख्याध्यापक वामन खोत यांचे उद्गार

मालवण दि प्रतिनिधी
आपल्या पाल्याला शाळेत पाठवताना पालक हा आपले प्रतिबिंब शाळेत पहात असतो त्यामुळे शाळेत दाखल होणाऱ्या मुलाची भविष्यातील आर्थिक उन्नती लक्षात घेऊन शिक्षकाने काम केले पाहिजे याची जाणीव ठेवून गेली तेहत्तीस वर्षे शिक्षण क्षेत्रात काम केले हे करताना सर्वांना बरोबर घेऊन काम केल्याने आज सेवानिवृत्ती होताना यशपूर्तीचा जो आनंद आहे तो आनंद मनाला सुखावणारा आहे असे प्रतिपादन भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजचे माजी मुख्याध्यापक श्री वामन खोत यांनी येथे बोलताना केले

मालवण येथील भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कुल मालवणचे मुख्याध्यापक श्री. वामन खोत हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले त्यानिमित्ताने श्री. खोत सर यांचा आज संस्थेच्या वतीने सेवानिवृत्तीपर सत्कार सोहळा संस्थेचे ऑनररी जनरल सेक्रेटरी श्री साबाजी करलकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे चेअरमन श्री सुधीर हेरेकर हे उपस्थित होते यावेळी व्यासपीठावर जॉईंट सेक्रेटरी श्री. चंद्रकांत मयेकर, लोकल कमिटीचे सेक्रेटरी दशरथ कवटकर, खजिनदार जॉन नऱ्होना, सौ. उषादेवी खोत, मुख्याध्यापक एच. बी. तिवले सर माजी मुख्याध्यापिका एस. एस. टिकम, राजा देसाई, प्रकाश कुशे, श्री. सुतार, वडाचापाट हायस्कुलचे मुख्याध्यापक प्रसाद कुबल ,औदुंबर भागवत, आर बी देसाई, संदीप अवसरे, प्रा रुपेश बांदेकर, प्रा गावडे आदी व इतर मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी नूतन मुख्याध्यापक श्री. तिवले सर यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर प्रास्ताविक आर. डी. बनसोडे यांनी केले. यावेळी आपल्या भाषणात श्री खोत सर म्हणाले , ज्याच्या खांद्यावर जबाबदारीचे ओझे असते त्याने ते विसरायचे नसते आणि रुसायचेही नसते सर्वांना बरोबर घेऊन पुढे जायचे असते त्यासाठी निराश होऊन चालणार नाही तर सकारात्मक विचार घेऊन जीवनात मार्गक्रमणा केली पाहिजे. नेमकी हिच गोष्ट ध्यानी ठेऊन संस्थेने माझ्यावर ज्या ज्यावेळी जबाबदाऱ्या दिल्या त्या जबाबदाऱ्या समर्थपणे माझ्या परीने पेलल्या. आज जो माझ्या कार्याचा गुण गौरव होतोय तो माझा एकट्याचा नसून सर्वांचा आहे. सर्वांनी मला साथ दिली त्यात संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्यामुळेच मी भंडारी हायस्कुल सारख्या मोठ्या प्रशालेचे मुख्याध्यापक पद सांभाळू शकलो. जीवनाच्या वाटेत प्रेम राग तिरस्कार या क्रियांचा मारा होऊ शकतो. त्याला प्रतिक्रिया न देता सकारात्मक क्रिया केली तरच आपले जीवन सुखकर होईल असेही श्री. खोत सर म्हणाले. यावेळी श्री खोत सर यांनी संस्थेचे अध्यक्ष श्री विजय पाटकर, संस्थेचे चेअरमन श्री सुधीर हेरेकर, संस्थेचे ऑनररी जनरल सेक्रेटरी श्री साबाजी करलकर यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल विशेष उल्लेख करीत ऋण व्यक्त केले

यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना संस्थेचे ऑनररी जनरल सेक्रेटरी श्री साबाजी करलकर यांनी श्री. खोत सरांच्या कार्याचा आढावा घेत कौतुक केले. श्री. करलकर यांनी आपल्या भाषणात श्री. खोत सर यांनी मुख्याध्यापक म्हणून आपली कारकीर्द गाजवीतानाच या शाळेसाठी, संस्थेसाठी अहोरात्र काम केले म्हणूनच आज शाळेच्या नावलौकिकात भर पडत आहे असेही ते म्हणाले.

यावेळी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, श्री खोत सर यांचा मित्रपरिवार विद्यार्थी वर्ग यांची समयोचित भाषणे झाली यावेळी माजी मुख्याध्यापक श्री. खोत सर यांचा संस्थेचे ऑनररी जनरल सेक्रेटरी श्री. साबाजी करलकर यांच्या हस्ते शाल श्रीफळ आणि सन्मानपत्र तर सौ उषादेवी खोत यांचा ओटी भरून सत्कार करण्यात आला यावेळी खोत यांनी संस्थेला एक लाख रुपये तर माजी मुख्याध्यापिका सौ सुप्रिया टिकम यांनी २५ हजार रुपयाची देणगी दिली शेवटी आभार प्रदर्शन सहाय्यक शिक्षिका कुमारी सुनंदा वराडकर यांनी केले. तर सूत्रसंचालन प्रफुल्ल देसाई यांनी केले.

You cannot copy content of this page