⚡वेंगुर्ला ता.२०-: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या प्रलंबित लाभार्थ्यांसाठी ग्रामपंचायत स्तरावर विशेष मोहीम राबवावी यासाठी भाजपाने तहसीलदार व कृषी अधिकारी यांचे लक्ष वेधले आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत चौदाव्या हप्त्याच्या लाभ वितरणाची कार्यवाही सध्या सुरू आहे. केंद्र सरकारने योजनेच्या चौदाव्या हप्त्याच्या लाभासाठी लाभार्थ्याने ई-केवायसी, बँक खाते आधारशी संलग्न करणे व लॅड सिलिग करणे या बाबी अनिवार्य केलेल्या आहेत. ग्रामीण भागातील शेतक-यांना शहरात येऊन या सर्व गोष्टी करणे शक्य नसल्याने बरेच शेतकरी ह्या योजनेच्या लाभापासून वंचित रहाणार आहेत. आता राज्य सरकारची ‘नमो शेतकरी महा सन्माननिधी‘ ही पण योजना सुरू होणार आहे व प्रत्येक शेतक-याच्या खात्यात आणखी ६००० रु.जमा होणार आहेत. त्यामुळे शेतक-यांचे वार्षिक १२००० रु.नुकसान होणार आहे. हे नुकसान टाळण्यासाठी शासनाच्यावतीने तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये ही विशेष मोहिम राबवावी तसेच प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये या योजनेतील कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी कृषी सहायक, ग्रामसेवक, तलाठी तसेच पोस्ट खात्यातील कर्मचारी यांना एकत्रित उपलब्ध करून प्रलंबित ई-केवायसीची पूर्तता करावी अशी मागणी या निवदेनाद्वारे तहसीलदार ओंकार ओतारी व कृषी अधिकारी निरंजन देसाई यांच्याकडे केली आहे.
यावेळी भाजपाचे प्रसन्ना देसाई, साईप्रसाद नाईक, बाळा सावंत, ज्ञानेश्वर केळजी, मनवेल फर्नांडीस, दादा केळुसकर, पपु परब, बंड्या पाटील, ताता मेस्त्री, राजु परब, रमेश नार्वेकर, रामु परब, नितीन कोचरेकर, जयवंत तुळसकर, अनंत नेरुरकर, पांडुरंग सावंत, पंढरीनाथ राऊळ, लक्ष्मण वेतोरेकर, कृष्णाजी सावंत, सखाराम केळजी, संतोष सावंत, सुनील प्रभू खानोलकर, सौरभ नाईक, अंकुश पवार, ललीता पवार इत्यादी भाजपा पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
तहसीलदार व कृषी अधिकारी यांनी ताबडतोब याची कार्यवाही सुरू होईल असे अभिवचन भाजपा शिष्टमंडळाला दिले.