विश्वासघाताने मिळविलेले मंत्रीपद टिकत नाही: अमित सामंत यांची मंत्री केसरकरांवर टीका
⚡कुडाळ ता.२०-: आज २० जूनला महाराष्ट्राच्या लोकशाहीला काळीमा फासणाऱ्या खोके सरकारला एक वर्ष पूर्ण झाले. गेल्यावर्षी याच दिवशी ४० आमदारांना घेऊन विद्यमान मुख्यमंत्री यांनी महाराष्ट्रात पुर्वी न झालेल आणि भविष्यात न होणारं अस अत्यंत विश्वासघातकी कृत्य करून खोके सरकार स्थापन केलं आणि त्याचा निषेध म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडून आजचा दिवस हा ‘जागतिक गद्दार दिन’ म्हणून ओळखला जाईल, अशी खरमरीत टीका राष्ट्रवादीचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी केली आहे.
यावेळी पुढे बोलताना सामंत म्हणाले कि , वैषम्य वाटतं कि सिंधुदुर्गमधील आमदार दिपक केसरकर हे सुद्धा या गद्दारांमध्ये सामील आहेत त्यांनीसुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेचा विश्वासघात केलेला आहे. मंत्रीपद मिळवलं त्या मंत्रीपदातही ते सपशेल अपयशी ठरलेले आहेत कारण लोकांचा विश्वासघात त्यांना भविष्यात कधीही राजकारण करू देणार नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा इतिहास आहे कि ज्यांनी ज्यांनी लोकांचा विश्वासघात केला ते राजकारणात यशस्वी ठरले नाहीत. केसरकर यांनी लोकांचा विश्वासघात करून मिळवलेल मंत्रीपद जास्त दिवस टिकणार नाही. सिंधुदुर्गातील जनता तुम्हाला परत कधी आमदार म्हणून निवडून देणार नाही अशी ग्वाही आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने देतो , अशा गद्दारांकडे लक्ष वेधण्यासाठीच आज आम्ही खोके मांडून त्यांची महिलांच्या हस्ते चपलांनी पूजा केलेली आहे. आणि त्यांना चपलांचा हार घालण्यात आला आहे. कारण त्यांची लायकीच ती आहे. आपल्याच पैशातून हे मंत्री झाले आहेत त्याचा निषेध म्हणून आज आम्ही हा काळा दिवस म्हणून साजरा करत आहोत “
राज्याच्या शिंदे फडणवीस सरकारला आज २० जून रोजी एक वर्ष पूर्ण होत असून आजच्या दिवस सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस कडून काळा दिवस म्हणून साजरा करून शिंदे फडणवीस सरकारचा खोके सरकार म्हणून प्रतिकात्मक खोके उभे करून चपलांचा हार घालून उपहासात्मक आरती करून, चपलांचाच प्रसाद दाखवून खोके सरकारचा घोषणा देत निषेध करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, उपाध्यक्ष अनंत पिळणकर, प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर, कोकण विभाग अध्यक्ष अर्चना घारे-परब, जिल्हा सरचिटणीस भास्कर परब, बाळ कनयाळकर, निलेश गोवेकर, आत्माराम ओटवणेकर, शिवाजी घोगळे, पुंडलिक दळवी, नझीर शेख, सर्वेश पावसकर, सचिन पाटकर, सावली पाटकर, जयराम डिगसकर, देवेंद्र पिळणकर, देवेंद्र टेमकर, इफ्तिकार राजगुरू, राकेश नेवगी, उत्तम सराफदार, साबा पाटकर, आनंद आकेरकर, कृष्णा बिबवणेकर आदी उपस्थित होते.
तसेच यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस कोकण प्रदेश अध्यक्षा अर्चना घारे परब यांनी निषेध व्यक्त करताना असे प्रतिपादन केले कि , ५० खोके घेऊन स्थापन झालेल्या शिंदे फडणवीस सरकारला एक वर्ष पूर्ण झाले म्हणून जागतिक गद्दार दिन आणि खोके दिन म्हणून पूर्ण महाराष्ट्रात साजरा होत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्ह्यात आम्ही गद्दार दिन म्हणून साजरा करत आहोत. , शिंदे सरकार आल्यानंतर जनतेचा अपेक्षाभंग झालेला आहे. बेरोजगारी, महागाई , आणि महिलांवरील अत्याचाराच प्रमाण वाढलेलं आहे , हे सरकार अस्तीत्वात आल्यानंतर सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर त्यांनी काहीही केलेले नाही. उलट महाराष्ट्रात आलेले रोजगार बाहेरच्या राज्यात घालवण्याच काम यांनी केलेलं आहे.