युवक कॉंग्रेस जिल्हा प्रवक्ते अरविंद मोंडकर यांनी मानले आदित्य ठाकरे यांचे आभार
*💫मालवण दि.२४-:* कॅराव्हॅन पर्यटनाच्या माध्यमातून पर्यटनाचा शाश्वत विकास पर्यावरण संतुलन राखण्यासाठी झाडांचे संरक्षण व संवर्धन बाबत घेतलेल्या निर्णयाबाबत पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचे युवक काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते अरविंद मोंडकर यांनी आभार मानले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीत पर्यावरणाचे संरक्षण करत शाश्वत विकासाचे उद्दिष्ट साधण्यासाठी व झाडांचे संरक्षण व संवर्धन या संदर्भात पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर जी व इतर अधिकारी यांसोबत विविध उपाययोजनावर चर्चा तसेच पर्यटन संचालन उपसंचालक सौ. सुप्रिया करमरकर सोबत झालेल्या बैठकीत पर्यटन विकासाच्या अनुषंगाने कॅराव्हॅन पर्यटन धोरणास मंजुरी देण्यात आली. यात राज्यातील कोकण किनारपट्टी वरील निसर्गरम्य समुद्र किनारे, ऐतिहासिक किल्ले, इतर भागातील असलेली थंड हवेची ठिकाणे, नदी, वनसंपदा, ऐतिहासिक वारसास्थळे, लेणी, धरणे अशी अनेक पर्यटनाची ठिकाणे आहेत. यातील अनेक ठिकाणी हॉटेल वा निवासस्थानांच्या सोयी काहीशा कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. तसेच अनेक ठिकाणी बांधकामासाठी काही स्वरूपात प्रतिबंध घालण्यात आले आहेत. अशा ठिकाणी कॅराव्हॅन व कॅम्परव्हॅनच्या साहाय्याने पर्यटकांना निवासाच्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे धोरण पर्यटन मंत्री आदित्य उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य शासनाने तयार केले आहे. कोकणातील तरुणांना या संधीचा फायदा करून घेता येईल या दृष्टीने पर्यटन विभाग वतीने जिल्हास्तरावर शिबीर भरविण्यात यावी त्या माध्यमातून तरुणांना जिल्ह्यातील पर्यटनास जोडधंदा म्हणून या कॅराव्हॅन पर्यटनाचा पर्याय उपलब्ध होईल. त्याच प्रमाणे समुद्रावर चालणाऱ्या जलक्रीडा यां साठी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तीनही जिल्ह्यातील तरुणांना या समन्वय समितीत संधी द्यावी अशी विनंती पर्यटन मंत्र्यांना केली असता यावर पर्यटन बाबतीत अजून काही सूचना असतील तर त्या लेखी स्वरूपात द्या असे पर्यटन मंत्री म्हणाले. यानुसार लवकरात लवकर या तीनही जिल्ह्यातील होतकरू तरुणांना एकत्र घेऊन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे व या विभागाचे अधिकारी यांची कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन पुन्हा मुंबईत भेट घेणार आहे, अशी माहिती अरविंद मोंडकर यांनी दिली आहे.