माजी मुख्यमंत्री नारायण राणे : कोरोनाच्या नावाखाली पुन्हा लॉकडाऊन करण्याचा प्रयत्न
सिंधूदुर्गनगरी ता २४ सहा आठवड्यांचे अर्थसंकल्पीय अधिवेशन पाच दिवसांत गुंडाळायचे असल्याने राज्य सरकार कोरोनाचा बाऊ करीत आहे. त्यांच्यात विरोधकांना सामोरे जाण्याची हिम्मत नाही. त्यामुळे राज्यात कोरोना वाढल्याचा बाऊ करीत पुन्हा लॉकडाऊन करण्याचा प्रयत्न सुरु आहे. ८ मार्च ही अधिवेशन मुदत असल्याने तोपर्यंत राज्यात कोरोना वाढतच राहणार आहे. यांचे मंत्री सुद्धा अचानक कोरोनाग्रस्त होवू लागले आहेत. केवळ पाच दिवस अधिवेशन घेण्यासाठी सरकारची ही पळवाट असून हा राजकीय कोरोना आहे असा आरोप भाजप नेते खा नारायण राणे यानी बुधवारी पत्रकार परिषदेत केला. कुडाळ तालुक्यातील पडवे येथील एस एस पी एम मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेला आ नितेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, चिटणीस मिलिंद कुलकर्णी, दीपलक्ष्मी पडते, विनायक राणे आदी उपस्थित होते. यावेळी खा राणे यानी, कोरोना उपाययोजना करणे आवश्यक होते. त्या राज्य सरकारने केल्या नसल्याने पुन्हा कोरोना रुग्ण वाढत आहेत. राज्याची आरोग्य यंत्रणा कमकुवत आहे. डॉक्टर नाहीत. औषधे व साधन सामग्री नाही. परिणामी कोरोना मृत्यु दरात महाराष्ट्र देशात एक नंबरवर राहिला आहे, असा आरोप केला. यावेळी पुढे बोलताना खा राणे यानी, विकास ठप्प झाला आहे. जिल्हा नियोजनचा निधी डिसेबर महिन्यात दिला आहे. अद्याप कामांची वर्क ऑर्डर नाही. हे सरकार उपाययोजना करण्यात कमी पडले आहे. प्रशासनावर सरकारचा अंकुश नाही. त्यामुळे हे सरकार पूर्णपणे निष्क्रिय असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.