आदिवासी कातकरी मारहाण प्रकरण
*💫कणकवली दि.२४-:* फोंडाघाट येथील आदिवासी कातकरीना मारहाण केल्याप्रकरणी नायालयीन कोठडीत असलेल्या सर्व वनकर्मचाऱ्यांची सशर्त जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे. आरोपींच्या वतीने ऍड.उमेश सावंत यांनी जामीन मंजुरीसाठी यशस्वी युक्तिवाद केला. फोंडाघाट येथील आदिवासी कातकरी महिलेसह पुरुषांना शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी फोंडाघाट वनपाल शशिकांत साटम, वनरक्षक संदिपकुमार सदाशिव कुंभार, सुभाष दिलीप बडदे, मच्छीन्द्र श्रीकृष्ण दराडे, सत्यवान सहदेव कुबल यांच्यावर ऍट्रोसिटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. जिल्हा न्यायालयाने सर्व आरोपीना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. आरोपींच्या वतीने ऍड उमेश सावंत यांनी जिल्हा विशेष न्यायलयात जामीन अर्ज सादर केला होता. विशेष न्यायाधीश प्रकाश कदम यांनी सर्व आरोपींना 15 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला. दर आठवड्याला तपासी अधिकारी डीवायएसपी कार्यालयात हजेरी लावणे आणि फोंडाघाट येथील कातकरी वस्तीत न जाणे अशा शर्ती घालण्यात आल्या आहेत.