⚡बांदा ता.०४-: पाडलोस गाव व्हाट्सअप ग्रुप हा मनोरंजनाचा ग्रुप नसून समाजशील कार्यकर्त्यांचा ग्रुप आहे. ग्रुपच्या माध्यमातून रक्तदान शिबिर होणे ही खूप मोठी बाब आहे. त्यामुळे हा पाडलोस व्हाट्सअप गाव ग्रुप समाजापुढे एक आदर्श निर्माण करत असल्याचे प्रतिपादन, सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश तेंडुलकर यांनी केले.
पाडलोस गाव व्हाट्सअप ग्रुप आयोजित रक्तदान शिबिरात श्री. तेंडुलकर बोलत होते. व्यासपीठावर एसएसपीएमचे डॉ. सुरज वानखेडे, सरपंच सलोनी पेडणेकर, ग्रुपचे अध्यक्ष विश्राम गावडे, सदस्य राजू शेटकर उपस्थित होते.
प्रत्येक घरातून रक्तदान करण्यासाठी नागरिकांनी समोर यायला पाहिजे. रक्ताची कधीही कुठेही गरज लागल्यास सिंधू रक्त प्रतिष्ठान आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार अशी ग्वाही प्रकाश तेंडुलकर यांनी दिली.
डॉ. सुरज वानखेडे म्हणाले की, व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून अनेक गोष्टी सुरू असतात. परंतु आपल्या माणसांसाठी आपल्याच गावात रक्तदान शिबिर घेणे ही खूप महनीय व उल्लेखनीय कामगिरी आहे. रक्तदान केल्यास शरीरात रक्त बनवण्याची प्रोसेस अधिक जलद बनते. पाडलोस व्हाट्सअप ग्रुपचे रक्तदान कार्य महान असल्याचे उद्गार एसएसपीएम कॉलेज आणि लाईफ टाईम हॉस्पिटलचे डॉ. सुरज वानखेडे यांनी काढले.
गावात प्रथमच झालेल्या शिबिरात मीनाक्षी सावंत व काका परब यांनी प्रथम रक्तदान केले. तर प्रमिला करमळकर-ठाकूर यांच्यासह 20 दात्यांनी रक्तदान केले तर वाढत्या उष्मामुळे 15 जणांना रक्तदान करता आले नाही. दरम्यान, पहिल्यांदाच आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिरातून एक उत्साहात निर्माण झाला आहे. येत्या काळात ग्रुपच्या सर्व सदस्यांच्या सहकार्याने महारक्तदान शिबीर आयोजित करू असे सूतोवाच अध्यक्ष विश्राम गावडे यांनी केले. राजू शेटकर यांनी सर्वांचे आभार मानले.
