पालकमंत्री चव्हाण यांचे आवाहन;महाविजय यात्रेचा उत्साहात समारोप
⚡सावंतवाडी ता.१९ प्रसन्न गोंदावळे-: संकल्प करण्यासाठी आपण एकत्र जमलो आहोत. पंतप्रधान मोदी यांनी विकासाचा विश्वास प्रत्येक नागरिकाला दिला आहे. भाजपचा कार्यकर्ता अपेक्षा ठेवून काम करीत नाहीत. ते पक्ष मोठा करण्यासाठी काम करतात. पक्षाची देश त्यागाची भूमिका सर्व नागरिकां पर्यंत पोहोचविली पाहिजे. केंद्र व राज्य शासनाच्या योजना तळागाळात पोहोचवल्या पाहिजेत. केलेल्या कामाचे क्रेडिट घेण्यास शिकले पाहिजे, असे आवाहन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले. ते महाविजय यात्रा समारोप कार्यक्रमात बोलत होते.
पुढे बोलताना मंत्री चव्हाण यांनी, डिजिटल माध्यम पुढे येत आहे. त्याचा वापर करून कार्यकर्त्यांना, प्राथमिक सदस्यांना योजना लोकांपर्यंत पोहोचवून प्रचार, प्रसिद्धी करायची आहे. आपल्या पक्षाच्या नेत्यांना सामाजिक माध्यमांवर फॉलो केले पाहिजे. लोकसभा, विधानसभा आपल्याला जिंकायच्या आहेत. भाजपच्या विचारांना मानणारा वर्ग वाढवायचा आहे. शत प्रतिशत भाजप बनविण्यासाठी मेहनत घेतली पाहिजे, असे आवाहन मंत्री चव्हाण यांनी केले.
