कोकणात औषधी, सुगंधी वनस्पती लागवडीची शेती फायदेशिर

⚡कणकवली ता.१८-:
निसर्गाच्या विविधतेने नटलेला सह्याद्रीच्या कुशीत विसावलेल्या कोकणातील भौगोलिक परिस्थितीनुसार आपण योग्य नियोजन करून त्याप्रमाणे विविध व्यवसाय केले तर नक्कीच फायदा होणार याच पार्श्वभूमीवर औषधी व सुगंधी वनस्पतींची लागवड हा एक फायदेशीर शेती व्यवसाय होऊ शकतो किंबहुना ती काळाची गरज आहे. असे विचार जाणवली येथे झालेल्या कार्यशाळेत उपस्थित मान्यवर व तज्ञांकडून मांडण्यात आले.

कोकण कोणार्क ऍग्रो इंडस्ट्रीज एलएलपी यांच्यावतीने कणकवली जाणवली येथील हॉटेल निलम कंट्री साईड येथे औषधी व सुगंधी वनस्पती लागवड विषयावरील दोन दिवसीय कार्यशाळेस शेतकरी व युवक यांचा चांगला प्रतिसाद लाभला. कार्यशाळेस डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विज्ञान केंद्र, दापोलीचे डॉ. अजय राणे, डॉ. त्रिपाठी हे उपस्थित होते. तसेच सिमॅप लखनौ या संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ. राजीव वर्मा आणि डॉ. ऋषिकेश भिसे आणि या उद्योगा संबंधीच्या विविध योजना यांचे मार्गदर्शन करण्यासाठी आयुष पुणे या संस्थेचे डॉ. स्वप्नील शिंदे आणि ऋषिकेश फुंदे अशी तज्ञ मंडळी उपस्थित होती.
75 शेतकर्‍यांसाठी अतिशय वाजवी किमतीत ही संधी उपलब्ध करून दिली होती त्यात शेतकर्‍यांचा उत्तम प्रतिसाद लाभला. दोन दिवसाच्या कार्यक्रमात तालुका कृषि विभागाचे अधिकारी सौ. वैशाली मुळे उत्तरार्धात बँकेच्या शेतकर्‍यांसाठीच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी युनियन बँक ऑफ इंडिया याचे व्यवस्थापक कृष्णराज सातोसे हेही उपस्थित होते. कोकण कोणार्क ऍग्रो इंडस्ट्रीजचे संचालक बी. डी. सावंत, नंदू सावंत, सुनील सावंत, सुनील नाईक, कमलाकर सावंत, हे संस्थेतर्फे उपस्थित होते. सगळ्या शेतकर्‍यानी शेवटी संस्थेला धन्यवाद देऊन असेच कार्यक्रम वारंवार घडवून आणावेत अशी संचालकांना विनंती केली. आगामी काळात औषधी व सुगंधी वनस्पती लागवडी संदर्भात सांघिकपणे प्रयत्न करत या क्षेत्रात अधिक जोमाने काम करण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.

You cannot copy content of this page