शासनाचे वाया गेले ३३ लाख रुपये;
उपोषण करण्याचा संजय आईर यांचा इशारा
बांदा/प्रतिनिधी
वाफोली येथील तीन वाड्यांसाठी मंजूर असलेली ३३ लाख अंदाजपत्रक असलेली राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना प्रस्तावित जागेतून बेकायदेशीररित्या स्थलांतर केल्याने ती अयशस्वी होऊन ३३ लाख खर्च करूनही ३३ लिटर पाणीही तिन्ही वाड्यांना मिळालेले नाही. त्यामुळे शासनाचे ३३ लाख वाया गेले असून गावाचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. या प्रकरणी तत्कालीन सरपंच व अध्यक्ष, ग्राम पाणी व स्वच्छता समिती यांच्याकडून वसुली करून गुन्हे दाखल करण्याची मागणी संजय आईर यांनी केली आहे. यासंदर्भात १० एप्रिल रोजी संजय आईर व ग्रामपंचायत सदस्य मंथन गवस, गौरी गवस, स्नेहा आईर या उपोषण छेडणार असून त्यावेळी न्याय न मिळाल्यास संयुक्त राजीनामे देणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे.
जलजीवन मिशन योजनेंतर्गत मंजूर असलेल्या योजनेसाठी हस्तांतरण करण्यात आलेल्या दोन गुंठे जमिनीचा सर्व्हे करून ती रितसर ताब्यात घेऊन त्याची नोंद सातबारा सदरी दाखल करून घेण्यात यावी, असा अर्ज ग्रामपंचायतीकडे केला होता. ग्रामपंचायतीने त्याबाबत कसलीही कार्यवाही न करता मूळ प्रस्तावित जागेवर योजना न राबविता वादग्रस्त जागेवर एकाही सदस्याला विश्वासात न घेता काही ठराविक चार लोकांना घेऊन भूमिपूजन करून काही प्रमाणात विहिरीचे खोदकाम करण्यात आले. याबाबत मासिक सभेत जाब विचारला असता सरपंच, ग्रामसेवकांनी सदस्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच ठेकेदारांना याबाबत विचारले असता आपल्याला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सदर जागेवर काम करण्यासाठी तोंडी धमकी दिली व ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याबाबत नोटीस दिली, असे ठेकेदाराने सांगितले.
म्हणजे सीईओ राजकीय दबावाखाली वावरत असून नियमबाह्य जागेवर काम करण्यासाठी ठेकेदारावर दबाव आणून वादग्रस्त जागेवर काम करण्यास ठेकेदार यांना प्रवृत्त करत असल्याचे आईर यांनी म्हटले आहे.
पत्रकात म्हटले आहे की, सदर वादग्रस्त जागेवर सदस्यांना व तक्रारदार यांना विश्वासात न घेता काम सुरु करण्यात आले आहे. मुख्यकार्यकारी यांनी भविष्यात वाद निर्माण होणार नाही, योजना वादात अडकणार नाही आणि वादात अडकून योजना धोक्यात आल्यास होणाऱ्या नुकसानीला आपण जबाबदार राहीन असे लेखी स्वरूपात आम्हाला पत्र द्यावे. आम्ही सगळ्या तक्रारी मागे घेण्यास तयार आहोत.
