पाडलोसमधील प्रकार ; बागायतदार चिंतेत;नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी
*💫बांदा दि.१४-:* आंबा उत्पादनाच्या ऐन हंगामात बागेत गव्यांचा वावर असल्यामुळे मेटाकुटीस आलेला शेतकरी बागायतदार वर्ग पुरता हैराण झाला आहे. भातशेती पाठोपाठ गव्यांकडून आता आंबा बागेचेही नुकसान होणार असल्याच्या भीतीखाली बागायतदार असून वनविभागाने तात्काळ याकडे लक्ष देऊन उपाययोजना करण्याची मागणी बागायतदारांकडून केली जात आहे. गतकाळात गव्यांकडून झालेली भातशेतीचे नुकसान भरपाई कागदावरच धूळखात पडलेली आहे. असे असताना आज सकाळी दहा वाजताच्या सुमारास केणीवाडा येथील बाळा परब यांच्या आंबा बागेत दहा ते बारा गव्यांचा कळप दिसून आला. गुरांना चारा देण्यासाठी गेलेले पाडलोस मधील युवक मंदार गावडे, दत्तगुरू गावडे, सागर गावडे यांनी गवे आंबा बागायती फिरत असल्याचे पाहिले. तिन्ही युवक काहीसे घाबरले हाेते परंतु त्यांच्यासोबत असलेल्या कुत्र्याने त्या गव्यांना पळवून लावल्यामुळे आंबा बागेचे होणारे नुकसान टळले. महिनाभरापूर्वी पडलेल्या पावसामुळे आंबा बागायतदार अगोदरच दुष्काळात तेरावा महिना असे दिवस काढत आहेत. त्यात गव्यांचा धुडगूस सुरू असल्याने कलमावरील फळे व मोहोर गळून पडण्याची शक्यता बागायतदारांनी वर्तवली आहे. त्यामुळे भविष्यात जर आंबा बागायतीचे गव्यांपासून नुकसान झाले तर कोणत्याही कागदपत्र न विचारता थेट भरपाई देण्याची मागणी आंबा बागायतदारांना मधून केली जात आहे.
