आचारसंहिता असल्याने अंमलबजावणी उशिराने;शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची माहिती
⚡सावंतवाडी ता.२१-: विनाअनुदानित शाळा मधील शिक्षक आणि शिक्षक सेवकांना भरीव निधी व वेतन प्राप्त होण्यासाठी आपण सभागृहामध्ये साडेअकराशे कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे सध्या आचारसंहिता सुरू असल्यामुळे लवकरच हे पॅकेज मिळेल असा विश्वास राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी बोलताना व्यक्त केला.
ते सावंतवाडी येथील डिके टुरिझम च्या अलकनंदा सभागृहात कोकण विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार ज्ञानेश्वर बारकू म्हात्रे यांच्या प्रचारार्थ स्नेह मेळाव्यात बोलत होते.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण, शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी, राष्ट्रीय मुख्याध्यापक महामंडळाचे माजी अध्यक्ष चिंतामणी तोरस्कर, सिंधुदुर्ग मुख्याध्यापक संघाचे सचिव गुरुदास कुसगावकर, राजेंद्र माणगावकर, सिंधुदुर्ग मुख्याध्यापक संघ उपाध्यक्ष रामचंद्र घावरे, नारायण उर्फ बबन राणे, सुजित कोरगावकर, प्रसन्ना देसाई, प्रतीक बांदेकर आदींसह मोठ्या संख्येने भाजप व बाळासाहेबांची शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच जिल्ह्यातील विविध शिक्षक व शिक्षकेतर संघटनांचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांचा ओढा इंग्रजी माध्यमांकडे वळत असल्यामुळे मराठी शाळा बंद पडण्याची वेळ आली आहे. मात्र येत्या काळात मातृभाषेत शिक्षण घेणे बंधनकारक करण्याबरोबरच “डिप्लोमा-इंजीनियरिंग” सारखे अभ्यासक्रम सुद्धा मराठीत शिकविले जातील. तसा निर्णय केंद्र स्तरावरच घेण्यात आला आहे. त्यामुळे मराठी शाळा बंद पडून शिक्षकांच्या नोकऱ्या जातील अशी जर कोणी भीती पसरवत असेल तर त्यावर विश्वास ठेवू नका, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी आज येथे केले.
दरम्यान विनाअनुदानित शाळा आणि शिक्षक सेवकांसाठी साडेअकराशे कोटीचे पॅकेज आमच्या सरकारने जाहीर केले आहे. त्यात शिक्षक सेवकांचे वेतन सुद्धा दुप्पट करण्यात आले आहे. आता येत्या काळात शिक्षकांचे विविध प्रलंबित प्रश्नही सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असा विश्वासही त्यांनी यावेळी दिला.
