दखल घ्यावी:जिल्हा पोलिस अधीक्षकांना अग्रवाल यांना संघटनेने दिले निवेदन
सिंधुदुर्गनगरी ता १६
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नाभिक व्यावसायिकांना अनोळखी मोबाईल कॉल येऊ लागल्याने त्यांच्यामध्ये घबराट पसरली आहे. याबाबत योग्य ती दखल घ्यावी .असे अनोळखी कॉल आल्यानंतर काय करावे याचे मार्गदर्शन व्हावे. अशी मागणी महाराष्ट्र नाभिक महामंडळ शाखा सिंधुदुर्ग च्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सिंधुदुर्गातील नाभिक व्यवसायिकांनी आज जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक संघटनेची ऑनलाईन सभा १४जानेवारी रोजी रात्री ११ ते १२ या वेळेस घेण्यात आली होती. सदर सभेला जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व नाभिक संघटनेचे सदस्य उपस्थित होते. अशावेळी नाभिक व्यावसायिक रुपेश पिंगुळकर, प्रकाश लाड ,जितेंद्र चव्हाण, संतोष टिपूगडे, यांना अनोळखी नंबर वरून मोबाईल कॉल आला होता. कुणीतरी “कुमार” आडनाव असणाऱ्या व्यक्ती कडून कॉल करून आपण आर्मीमध्ये असल्याचे सांगत होता. सदर अनोळखी व्यक्ती आपले ओळखपत्र, आधार कार्ड, आणि लोकेशन पाठवत आहेत. हिंदी भाषेत बोलत आहेत तर केस कापण्यासाठी आपल्याकडे तीस ते पन्नास लोक असल्याचे सांगत आहेत. त्यानंतर नाभिक व्यवसायिकांकडे त्यांचे स्कॅनर, आधार कार्ड किंवा अन्य माहिती मागून त्यांना पैसे ट्रान्सफर करणार असल्याचे अमिष दाखवत आहेत. त्यांनी पाठविलेल्या लोकेशनवर जाऊन पाहिले असता किंवा चौकशी केली असता त्या ठिकाणी कुणी आल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे यापुढे अधिक सावधगिरीने फोन संपर्क करण्याची वेळ निर्माण झाली आहे. तसेच नाभिक व्यवसायिकाची फसवणूक होऊ शकते .त्यामुळे जिल्ह्यातील नाभिक व्यावसायिक बांधव घाबरून गेले आहेत. तरी याबाबत आपण योग्य ती दखल घेऊन नाभिक व्यावसायिकांना मार्गदर्शन करावे. अशी मागणी नाभिक संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष अनिल आनावकर, जिल्हा सचिव सुधीर चव्हाण, राज्य सरचिटणीस राजन पवार ,रुपेश पिंगुळकर, चंद्रशेखर चव्हाण, यांच्यासह जिल्ह्यातील सुमारे २५ हून अधिक नाभिक व्यवसायिक उपस्थित होते.
