⚡वेंगुर्ला ता.२७-: आनंदयात्री वाङ्मय मंडळातर्फे दि.१० व ११ डिसेंबर या कालावधीत साई मंगल कार्यालय (जयवंत दळवी नगरी) वेंगुर्ला येथे वेंगुर्ला तालुका त्रैवार्षिक तिसरे मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे. या साहित्य संमेलनातील विविध कार्यक्रमांची सुरुवात ही ७ डिसेंबरपासून होत आहे.
दि. ७ रोजी सकाळी ११ ते १ या वेळेत पाटकर हायस्कूल येथे ‘विद्यार्थी कट्टा‘ या कार्यक्रमांतर्गत अनुभवी मार्गदर्शकांचे मार्गदश्रन, गोष्टी, गाणी, काव्यवाचन होणार आहे. दि. ८ रोजी बॅ.खर्डेकर कॉलेज येथे सकाळी ९ वाजता दोन गटात वक्तृत्व स्पर्धा, दुपारी ३ वाजता लेखक प्रदिप केळुसकर यांच्या ‘एकापेक्षा एक‘ या कथासंग्रहाचे प्रकाशन, दि. ९ रोजी सकाळी १० वाजता बॅ.खर्डेकर कॉलेज येथे कवी सुधाकर ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली ‘रंग उगवतीचे‘ वेंगुर्ला मर्यादित कवी संमेलन, दि. १० रोजी दुपारी ३.३० वाजता बॅ.खर्डेकर कॉलेज ते संमेलन स्थळ अशी ग्रंथदिडी, याचे उद्घाटन पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या हस्ते व प्राचार्य विलास देऊलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या ग्रंथदिडीमध्ये लेझिम पथक, ढोल पथक, विविध चित्ररथ, वारकरी भजन आदींचा समावेश असणार आहे.
दि. ११ रोजी सकाळी ९.३० वाजता लेखक डॉ.विनोद गायकवाड यांच्या हस्ते साहित्य संमेलनाचे उद्घाटन होणार असून यावेळी स्वागताध्यक्ष रघुवीर मंत्री, लेखक तथा संमेलनाचे अध्यक्ष कृष्णात खोत, गोविद गावडे, विनय पाटील, वीरधवल परब, अॅड.देवदत्त परुळेकर, अरुण दाभोलकर आदी व्यासपिठावर उपस्थित असणार आहेत. त्यानंतर ना.बा.रणसिग, अनुराधा दिक्षित, संजय घोगळे, सदाशिव सावत, सुनिल नांदोसकर, निकेत पावसकर, मंगेश मसके, रुजारिओ पिटो, प्रभाकर भागवत, संजिवनी देसाई, पौर्णिमा केरकर, डॉ.सतिश पवार यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार होईल. दुपारी १२.३० ते १.३० पर्यंत मराठी साहित्य व लोकसाहित्य यांचे अनुबंध स्पष्टकरणारा ‘रंगतरंग‘ या रंजनात्मक कार्यक्रम होणार असून यात ओव्या, वासुदेव, भजन, भारुड, लावणी व पोवाडा यांचे सादरीकरण केले जाणार आहे.
दुपारी ३ ते ३.१५ पर्यंत नाट्यप्रवेश सादरीकरण, ३.१५ ते ४.३० पर्यंत आनंदहरी (सांगली) यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कवी संमेलन होणार असून यात विठ्ठल कदम, सरिता पवार, सेजल परब, मोहन कुंभार, विनय सौदागर, कल्पना बांदेकर, पौर्णिमा केरकर, मनोहर परब, सुधाकर ठाकूर, प्रमोद कोयंडे सहभागी होणार आहेत. याचे निवेदन प्रा.वैभव खानोलकर हे करणार आहेत. सायंकाळी ४.३० ते ५ या वेळेत मराठी साहित्य संमेलनाचा समारोप होणार असून यावेळी पारितोषिक वितरण, कार्यकर्त्यांचा सन्मान, अध्यक्षीय मनोगत असे कार्यक्रम होणार आहेत. याचे निवेदक प्रा. सचिन परुळकर करणार असून डॉ.प्रा.आनंद बांदेकर हे आभार मानणार आहेत.
