⚡मालवण ता.२४-: मालवणच्या समुद्रात मासेमारी बोटीवरून पडून समुद्रात बेपत्ता झालेल्या दिनामानी धरम टपनो (वय ३०) (रा. ओडीसा, सध्या रा. मालवण) या खलाशाचा मृतदेह आज सकाळी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या मागील समुद्रात स्थानिक मच्छीमारांना सापडून आला. हा मृतदेह मालवण पोलिसांनी बोटीतून किनाऱ्यावर आणत ताब्यात घेतला आहे.
सोमवार दि. २१ नोव्हेंबर रोजी मालवण समुद्रात मासेमारी बोटीवर खलाशी म्हणून काम करणारा दिनामानी धरम टपनो हा बोटीवरून पडून बेपत्ता झाला होता. आज सकाळी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या मागील समुद्रात मासेमारी करणाऱ्या स्थानिक मच्छीमारांना मृतदेह सापडून आला. हा मृतदेह बेपत्ता झालेल्या खलाशी दिनामानी याचा असल्याचे स्पष्ट झाले. याबाबत पोलिसांना काळविल्यावर पोलिसांनी बोटीतून हा मृतदेह किनाऱ्यावर आणत ताब्यात घेतला. याबाबत मृत दिनामानी याच्या नातेवाईकांना कळविण्यात आले असून नातेवाईक मालवणात दाखल झाल्यावर मृतदेहाचे शवविच्छेदन करून तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे अशी माहिती मालवणचे पोलीस निरीक्षक विजय यादव यांनी दिली.
