समाज जागृती करणारा वाचक हा समाजातील सर्वश्रेष्ठ घटक

पी. जे. कांबळे: पद्मश्री मधू मंगेश कर्णिक यांच्या साहित्यावर झाले रसग्रहण

⚡कणकवली ता.२२-: वाचन हे माणसाला समृद्ध बनवत असतं. व्यक्तिगत विकासासोबत सामाजिक भान, जाणीव जागृती होण्यासाठी पुस्तकं मोठी भूमिका बजावतात. वाचक हा समाजातील सर्वश्रेष्ठ घटक आहे. सध्याच्या सोशल मीडियाच्या काळात पुस्तकांपासून दुरावत जाणारा वाचक पुन्हा दूरदृष्टी असणारा, चिंतनशील, जागृत आणि समाजाची जाणीव असणारा निर्माण होण्यासाठी जिल्हा ग्रंथालय संघामार्फत आयोजित करण्यात आलेली वाचक स्पर्धा ही खूप महत्त्वाची आहे, असे उद्गार कणकवली विद्यामंदिर प्रशालेचे प्रा. पी. जे. कांबळे यांनी काढले.

कणकवली नगर वाचनालय येथे जिल्हा ग्रंथालय संघामार्फत वाचक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेच्या परिक्षकीय मनोगतात ते बोलत होते. या वाचक स्पर्धेत पद्मश्री मधू मंगेश कर्णिक यांच्या साहित्य संपदेचे रसग्रहण करायचे होते. या स्पर्धेत हेमंत पाटकर यांनी प्रथम क्रमांक, वर्षाराणी प्रभू यांनी द्वितीय क्रमांक तर वंदना राणे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्यांना सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते ज्ञानेश्वरीच्या प्रतीची पूजा करून करण्यात आले. यावेळी वाचनालयाचे कार्यवाह महंमद इनीफ आदम पीरखान, सहकार्यवाह डी. पी. तानवडे, सदस्या कल्पना सावंत, वैजयंती करंदीकर, डॉ. विनायक करंदीकर, सदस्य व परीक्षक पी. जे. कांबळे व विजया गोसावी आदी उपस्थित होते. आपली बलस्थाने ओळखून समाज जागृतीसाठी हातभार लावणारा नागरिक निर्माण करण्यासाठी अशा प्रकारच्या वाचक स्पर्धा आवश्यक असल्याचे मत स्पर्धेच्या परीक्षक विजया गोसावी यांनी व्यक्त केले. तर पद्मश्री मधू मंगेश कर्णिक यांच्यासारखेच कोकणचे नाव उज्वल करणारे साहित्यिक या कोकण भूमीतून निर्माण होण्यासाठी आणि त्यांना प्रेरणा मिळण्यासाठी जिल्हा ग्रंथालय संघामार्फत अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचे मत जिल्हा ग्रंथालय संघाचे उपाध्यक्ष आणि नगर वाचनालयाचे सहकार्यवाह डी. पी. तानवडे यांनी मांडले.

पद्मश्री मधू मंगेश कर्णिक यांच्या साहित्य संपदेवर या स्पर्धेत रसग्रहण करायचे होते. यावेळी स्पर्धकांनी माहीमच्या खाडी, समर्पण, अबीर गुलाल, भाकरी आणि फुल, निरभ्र, माझा गाव माझा मुलुख, कोकणी ग वस्ती, देवकी, संधिकाल अशा मधू मंगेश कर्णिक यांच्या कथासंग्रह, कादंबरी आणि आत्मकथानवर रसग्रहण केले. यात हेमंत पाटकर यांनी केलेल्या ‘देवकी’ या कादंबरीच्या रासग्रहणाला प्रथम क्रमांक, वर्षाराणी प्रभू यांच्या ‘संधिकाल’ कादंबरीच्या रसग्रहणाला द्वितीय क्रमांक तर वंदना राणे यांच्या कोकणी ग वस्ती या या कथासंग्रहाच्या रसग्रहणाला तृतीय क्रमांक प्राप्त झाला. या विजेत्यांना ४ डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता कुडाळ येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय वाचक स्पर्धेत भाग घेता येणार आहे.

त्याचप्रमाणे नगर वाचनालयात वाचक मेळावा आयोजित करण्यात होता. या मेळाव्यात पी. जे. कांबळे यांनी डॉ. राज ताडेराव लिखित क्रांती गुरुजी लहुजी साळवे या पुस्तकावर विचार मांडले. मनोहर पालयेकर यांनी मधू मंगेश कर्णिक लिखित अबीर गुलाल, आरोही मेस्त्री यांनी सानेगुरुजी यांच्या श्यामची आई या आत्मचरित्रावर, वर्षाराणी प्रभू यांनी मधू मंगेश कर्णिक यांच्या संधिकाल या कादंबरीवर, वसुधा माने यांनी विकास आमटे यांच्या आनंदवन प्रयोगवन या आत्मकथानवर, अच्युत देसाई यांनी सदानंद मोरे यांच्या लोकमान्य ते महात्मा या पुस्तकावर विचार मांडले. यावेळी संपदा धुरी, हर्षदा धुरी, विनायक सापळे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page