Headlines

NEET पुनर्परीक्षा शांततेत आणि सुरळीत; जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची परीक्षा केंद्राला भेट…

⚡सिंधुदुर्गनगरी,ता.२१-: राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA), नवी दिल्ली यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली NEET Re-Examination 2026 कणकवली येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली कॉलेज परीक्षा केंद्रावर आज शांततेत, शिस्तबद्ध आणि सुरळीत वातावरणात पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी परीक्षा केंद्राला भेट देऊन परीक्षा केंद्रावरील विविध व्यवस्थांची माहिती घेतली. परीक्षार्थ्यांसाठी करण्यात आलेल्या सुविधा, सुरक्षा व्यवस्था, प्रवेश प्रक्रिया याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून आवश्यक सूचना दिल्या. ही परीक्षा कोणत्याही अडथळ्याविना आणि नियमांनुसार पार पडावी यासाठी प्रशासनाने विशेष दक्षता घेतली होती. यावेळी उपजिल्हाधिकारी आरती देसाई, उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे देखील उपस्थित होते.

कणकवली कॉलेज येथे आयोजित या परीक्षेसाठी एकूण ४९१ विद्यार्थी नोंदणीकृत होते. त्यापैकी ४१७ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली, तर ७४ विद्यार्थी अनुपस्थित राहिले. परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांची ओळख पडताळणी, सुरक्षा तपासणी आणि अन्य आवश्यक प्रक्रिया काटेकोरपणे राबविण्यात आल्या.

परीक्षा केंद्रावर प्रशासकीय अधिकारी, केंद्रप्रमुख, पर्यवेक्षक तसेच संबंधित कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. त्यामुळे संपूर्ण परीक्षा प्रक्रिया शांततापूर्ण आणि यशस्वीरीत्या पूर्ण झाली.

०००००

You cannot copy content of this page