खा अमोल कोल्हे यांची श्री स्वराज्य प्रतिष्ठानला आश्वासन
बांदा/प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज यांचा कार्यकर्तृत्वचा इतिहास तळागाळात पोहोचविण्याचे काम आपण श्री स्वराज्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून करत आहात हे कौतुकास्पद असून ही काळाची नितांत गरज आहे. भविष्यात श्री शिवशंभू प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने शिवविचार प्रत्येकाच्या मनामनात पोहचविण्याचे पवित्र कार्य करण्यासाठी आपण निश्चितच आपल्याला सहकार्य करू असे आश्वासन खासदार तथा अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी दिले.
श्री स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश मोरजकर यांनी खासदार डॉ. कोल्हे यांची पुणे येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत राकेश केसरकर उपस्थित होते. यावेळी विविध विषयांवर खासदार कोल्हे यांच्याशी चर्चा करण्यात आली. सक्षम व संवेदनशील युवा पिढी घडवायची असेल तर शिवविचार हे तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले पाहिजेत. यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांसाठी शिवविचारांवर आधारित स्पर्धात्मक उपक्रम राबवा अशा सूचना डॉ. कोल्हे यांनी दिल्या. पुढील महिन्यात आपण गोवा दौऱ्यावार जाताना निश्चितच बांद्यात थांबून श्री स्वराज्य प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचे कौतुक करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.