ओरोस ता.11-:
सिंधुदुर्ग पोस्टल एम्प्लॉइज को ऑप सोसायटी लिमिटेड मालवण या कर्मचारी संस्थेची निवडणूक बिनविरोध झाली आहे. १५ पैकी १३ जागा बिनविरोध झाल्या असून दोन जागा रिक्त राहिल्या आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकृष्ण मयेकर यांनी दिली.
सिंधुदुर्ग पोस्टल एम्प्लॉइज को ऑप सोसायटी लिमिटेड मालवण या कर्मचारी संस्थेची पंचवार्षिक निवडणूक जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक कार्यालय यांच्यावतीने जाहीर करण्यात आली होती. यासाठी १४ ऑक्टोबर पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मदत होती. १ नोव्हेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत होती. तर आवश्यकता भासल्यास १२ नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार होती. या संस्थेसाठी एकूण १५ संचालक निवडून द्यायचे होते. यात सर्वसाधारण मतदार संघातून दहा संचालक, दोन महिला प्रतिनिधी, एक इतर मागास प्रवर्ग, एक अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी आणि एक भटक्या विमुक्त जाती, जमाती व विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी असा प्रवर्ग निहाय समावेश आहे.
१५ पैकी एक महिला प्रतिनिधी आणि इतर मागास प्रवर्ग यासाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नव्हता. त्यामुळे या जागा रिक्त राहिल्या आहेत. तर उर्वरित १३ जागांसाठी १९ अर्ज दाखल झाले होते. यातील सहा उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने निवडणूक बिनविरोध झाली. बिनविरोध निवडून आलेल्या संचालकांमध्ये सर्वसाधारण दहा जागांसाठी अजय अनंत लाड, महेश मधुकर आलेकर, अशोक मारुती गावडे, महेंद्र मधुकर जगताप, बालाजी पंढरीनाथ मुंडे, विजय दत्ताराम चीपकर, राजेश रमाकांत निकम, दिनकर सहदेव मेस्त्री, मंगेश लक्ष्मण मोरये, विठ्ठल मारुती शेलटकर यांचा समावेश आहे.
दोन पैकी एका महिला सदस्यासाठी शरयू सुशांत परब यांचा एकच अर्ज आल्याने त्या बिनविरोध झाल्या आहेत. दुसरी जागा रिक्त राहिली आहे. इतर मागाससाठी अर्जच आलेला नाही. अनुसूचित जाती जमाती प्रवर्गासाठी निलेश लक्ष्मण ठाकूर यांचा एकमेव अर्ज राहिल्याने ते बिनविरोध निवडून आले आहेत. भटक्या विमुक्त जाती जमाती व विशेष मागास प्रवर्गासाठी रवींद्र गौतम घोळवे यांचाही एकमेव अर्ज आल्याने ते बिनविरोध झाले आहेत.