Headlines

कर्मवीरांच्या त्यागाची परतफेड करणे कठीणच-:-प्रा. रुपेश पाटील

⚡वेंगुर्ला ता.२३-: कर्मवीर भाऊराव पाटील म्हणजे त्यागाची मूर्ती आणि शैक्षणिक क्रांतीचे चा महामेरूच होते. समाजातील अज्ञान दूर करण्यासाठी आणि विशेष करून बहुजन समाजातील विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठीच कर्मवीरांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. आज लाखो विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनाचे नंदनवन रयत सारख्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून केले आहे. कर्मवीरांचा त्याग, बलिदान याची परतफेड आपण आजन्म करु शकणार नाही मात्र त्याप्रति उतरायी होऊन आदरयुक्त नमन त्यांना करु शकतो, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. रुपेश पाटील यांनी तुळस (तालुका वेंगुर्ला) येथे केले.
तुळस येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री शिवाजी हायस्कूल या प्रशालेत रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक व पद्मभूषण कर्मवीर डॉ.भाऊराव पाटील यांचा १३५वा जयंती सोहळा संपन्न झाला. यानिमित्ताने ‘कर्मवीर – एक त्यागमूर्ती’ या विषयावर प्रा. रुपेश पाटील यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्था साताऱ्याचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य अँथोनी डिसोजा होते. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती तुळस ग्रामपंचायतीचे सरपंच शंकर घारे, स्कूल कमिटी सदस्य मकरंद परब, श्री देव जैतीराश्रीत संस्थेचे उपाध्यक्ष विष्णू परब, जयवंत तुळसकर, पराग सावंत, प्रकाश परब, सुजाता पडवळ, श्री.माळकर, सौ.साळगावकर व शाळेचे मुख्याध्यापक रामकृष्ण देसाई आदी उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते कर्मवीरांच्या व लक्ष्मीबाई यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

यावेळी प्रा. रुपेश पाटील यांनी कर्मवीर भाऊराव पाटलांच्या जीवनातील विविध प्रसंगाचे चित्र विद्यार्थ्यांसमोर उभे केले. आपल्या जीवनात कर्मवीरांनी अंधश्रद्धेला थारा दिला नाही, विज्ञानवादी दृष्टिकोनातून त्यांनी बहुजनांच्या कल्याणासाठी देह झिजवला. तत्कालीन परिस्थितीत जनावरांना पाणी दिले जात होते, परंतु सोन्यासारख्या माणसांना पाण्यापासून वंचित ठेवण्याचा घाट काही नटदृष्ट लोकांनी केला होता. याचा प्रचंड राग घेऊन कर्मवीरांनी रहाटच मोडून काढला, अशा पद्धतीची कर्मवीरांना जनसामान्यांची आस्था होती. बहुजनांच्या व कष्टकऱ्यांच्या मुलांना शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी स्वतःच्या सौभाग्यवती लक्ष्मीबाई यांचे दागिने सुद्धा विकले. संपूर्ण महाराष्ट्र पायी पिंजून काढत महाराष्ट्रभर रयत शिक्षण संस्थेचा वटवृक्ष निर्माण केला. स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद अंगिकारले. अशा कर्मवीरांच्या समता, बंधुता, श्रमप्रतिष्ठा व सामाजिक बांधिलकी या गुणांचा स्वीकार आपणही करायला हवा, असे सांगत प्रा. रुपेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना मनोरंजक पद्धतीने कर्मवीरांची गाथा स्पष्ट केली. कार्यक्रमात उपस्थित असलेले मकरंद परब, सरपंच शंकर घारे, विष्णू परब, तसेच शिक्षक श्री. पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष अँथोनी डिसोजा यांनी आपल्या मनोगतातून रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून झालेल्या शैक्षणिक क्रांतीचा आढावा घेतला. आज आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था म्हणून रयत शिक्षण संस्था नावारूपास असल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेचा कारभार अत्यंत पारदर्शक असून आज लाखो विद्यार्थी या संस्थेच्या माध्यमातून आपल्या जीवनाला दिशा प्राप्त करून घेत आहेत असेही डिसोजा यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक रामचंद्र देसाई यांनी केले. अतिथींचा परिचय सहाय्यक शिक्षक प्रवीण सानप यांनी करून दिल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक घोडे – पाटील यांनी तर आभार प्रदर्शन ज्येष्ठ शिक्षक बाबासो चौगुले यांनी केले.

You cannot copy content of this page