⚡मालवण ता.१६-: विजयदुर्ग ते देवगड दरम्यानच्या समुद्रात पार्थ नावाचे तेलवाहू जहाज अपघात ग्रस्त झाल्याने विजयदुर्ग ते मालवण पर्यंतच्या समुद्रात तेल प्रदूषण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे मच्छीमारांनी मासेमारी दरम्यान योग्य ती दक्षता घ्यावी असे आवाहन सहाय्यक मत्स्य आयुक्त रवींद्र मालवणकर यांनी केले आहे.
विजयदुर्ग ते देवगड दरम्यानच्या समुद्रात ४० ते ४५ वाव पाण्यात पार्थ (IMO No. ९४४०२२७) हे १०१ मीटर लांबीचे तेलवाहू जहाज अपघातग्रस्त झाल्याचे तटरक्षक दल, रत्नागिरी यांनी मालवण येथील सहाय्यक मत्स्य व्यवसाय विभाग कार्यालयास कळविले आहे. दि. १६ सप्टेंबर रोजी सकाळी ०९.३० वाजता हे जहाज अपघातग्रस्त झाले. जहाजावरील खलाशी यांना वाचविण्यात आले आहे. परंतु सदर अपघातामुळे विजयदुर्ग ते मालवण समुद्र भागात तेल प्रदूषण होण्याची शक्यता आहे. तरी याबाबत सर्व मासेमार बांधव/ नौका मालक / खलाशी वर्ग यांनी याची नोंद घेऊन मासेमारी दरम्यान योग्य काळजी व दक्षता घ्यावी. किनारी भागात राहण्याच्या सर्व मच्छीमारांनी देखील दक्षता घ्यावी, असे सहाय्यक मत्स्य आयुक्त रवींद्र मालवणकर यांनी म्हटले आहे.
