शिवसेना तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांचा पलटवार
⚡मालवण ता.१६-: मालवण नगरपालिकेच्या व्यायामशाळेतील साहित्यावरून माजी खासदार निलेश राणें यानी आमदार वैभव नाईक यांच्यावर केलेल्या आरोपावरून त्यांनी आपले अज्ञान प्रगट केले आहे. सतत प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी निलेश राणे यांचा खटाटोप सुरू आहे. भाजप।पदाधिकाऱ्यांकडून अर्धवट माहिती घेत राणेंनी आपल्या अज्ञान पणाचा कळस गाठला असल्याची खरमरीत टीका करीत शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी निलेश राणे यानी तळाशील, देवबाग बंधाऱ्याच्या कामाचे लोकांना जेआश्वासन दिलेत्यात प्रत्यक्षात कामाचा कोणताच पत्ता नाही. त्यामुळे त्यांच्यावर कोणता गुन्हा दाखल करायचा, कोणती शिक्षा द्यायची हे भाजपच्याच पदाधिकाऱ्यांनी सांगावे असा टोलाही त्यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत लगावला.
मालवण शिवसेना शाखा येथे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांची आज पत्रकार परिषद झाली. यावेळी शहरप्रमुख बाबी जोगी, माजी नगरसेवक मंदार केणी, युवासेना शहरप्रमुख मंदार ओरसकर, उमेश मांजरेकर, आतू फर्नांडिस, प्रसाद आडवणकर आदी व इतर उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री हरी खोबरेकर म्हणाले, सी वर्ल्ड प्रकल्पाबाबत शिवसेना स्थानिक ग्रामस्थांच्या भूमिकेशी सोबत होती. शिवसेनेचा सिवर्ल्ड प्रकल्पाला कधीही विरोध नव्हता. जगातील सर्वात मोठा सिवर्ल्ड प्रकल्प २९५ एकर जागेत झाला असताना वायंगणी-तोंडवळी येथे त्यावेळी १३९० एकर एवढ्या मोठ्या जागेत स्थानिकांची घरे, शेती, मांगर आदी नष्ट करून प्रकल्प करण्यास विरोध होता. विकासकामाला शिवसेनेने विरोध केलेला नाही. २९५ एकर आणि १३९० एकर यात मोठी तफावत असून १००० एकरची जागा कोणाच्या घशात घालणार होते ? हे भाजपने जाहीर करावे असे सांगत ते म्हणाले, मालवण नगरपालिकेच्या व्यायामशाळेत आम. वैभव नाईक यांनी उपलब्ध केलेल्या निधीतून आलेले व्यायाम साहित्य मागे गेल्याच्या कारणावरून भाजप पदाधिकारी आम. नाईक यांच्यावर ४२० चा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आहेत. मात्र निधी उपलब्ध करून देण्याचे काम आम. वैभव नाईक यांनी केली असून त्या निधी अंतर्गत कार्यवाही करण्याची जबाबदारी नगरपालिका प्रशासनाची होती. साहित्य उपलब्ध झाल्यावर त्याची तपासणी करून आवश्यक बदल करण्याच्या तसेच चांगले साहित्य येई पर्यंत बिल न देण्याची सूचना प्रशासनाला आम. नाईक यांनी दिली होती. त्यामुळे या प्रकारात प्रशासन जबाबदार आहे. त्यामुळे आम. वैभव नाईक यांच्यावर आरोप करण्यात काहीही तथ्य नसून भाजप पदाधिकाऱ्यांनी निलेश राणेंना आणून एक प्रकारे आम. नाईक यांच्या कामाची प्रसिद्धीच केली आहे. गुन्हा दाखल करण्याची मागणी करून प्रशासनाची जाण नसणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांनी आपले अज्ञान उघड केले आहे अशी टीका यावेळी हरी खोबरेकर यांनी केली.
मच्छीमारी हंगाम सुरू होऊन दीड महिना झाला तरी वादळी परिस्थितीमुळे मच्छीमारी ठप्प झाली आहे. वातावरण असेच राहिल्यास ते मच्छीमारांसाठी चिंताजनक आहे. त्यामुळे वादळी परिस्थितीमुळे मच्छीमारी बंद राहिलेल्या कालावधीबाबत मत्स्य विभागाने सर्व्हे करून त्या कालावधीसाठी सानुग्रह अनुदान मत्स्य व्यवसाय विभागाने मच्छीमारांना मिळवून द्यावे अशी शिवसेनेची मागणी आहे. यासाठी मच्छीमार नेते व शहरप्रमुख बाबी जोगी यांच्या नेतृत्वाखाली मत्स्य विभागाकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे असे यावेळी हरी खोबरेकर यांनी सांगितले. तसेच वादळी पावसामुळे तालुक्यात शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा तहसील प्रशासनाकडून करण्यात यावा अशी मागणीही शिवसेनेची आहे, असेही खोबरेकर म्हणाले.
