पालकमंत्र्यांसह, खासदार, आमदार जिल्ह्यात निधी आणण्यास अपयशी ठरल्याने ग्रामपंचायतीत भाजपचे वर्चस्व

*माजी खासदार तथा भाजप प्रदेश सचिव निलेश राणे यांची सत्ताधाऱ्यांवर टीका*

*💫मालवण, दि.२९-:* काही वर्षांपूर्वी विकासात आघाडीवर असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला मागे नेण्याचे काम या सत्ताधाऱ्यांनी केले आहे. नारायण राणे सत्तेत असताना जिल्ह्याचा निधी कमी करण्याची धमक कोणत्याही अधिकाऱ्यांमध्ये नव्हती. मात्र राणे सत्तेतून गेल्यानंतर अधिकाऱ्यांवरील धाक संपला. पालकमंत्र्यांसह सत्ताधारी आमदार, खासदार निधी आणण्यात निष्क्रिय ठरले आहेत. ही चीड जनतेमध्ये असून यामुळेच तालुक्यातील ६ पैकी ५ ग्रामपंचायतीमध्ये भाजपला घवघवीत यश मिळाले आहे. तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकीत दिलेल्या प्रत्येक आश्वासनाची पूर्तता करण्यात येईल अशी ग्वाही भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार नीलेश राणे यांनी दिली. तालुक्यातील आडवली- मालडी, चिंदर, मसदे चुनवरे, गोळवण-कुमामे-डिकवल, कुणकवळे, खरारे-पेंडूर ग्रामपंचायतींना भेट देत निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, अशोक सावंत, बाबा परब, सभापती अजिंक्य पाताडे, बाळू कुबल, उपसभापती राजू परुळेकर, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, संतोष लब्दे, अनिल कांदळकर, सुभाष लाड, दादा नाईक, आशिष हडकर, शशांक मिराशी, महेंद्र चव्हाण, विक्रांत नाईक, जगदीश चव्हाण, विजय घाडीगावकर, बाळा घाडीगावकर, भार्गव लाड, जगदीश घाडीगावकर, निलेश बाईत, संतोष बाईत, मिलिंद घाडीगावकर, निलेश घाडीगावकर, सुधीर लाड, तुषार हाटले, घनश्याम चव्हाण, योगेश परब, दामिनी घाडीगावकर, ज्योती लाड, संतोष यादव, अमृता चव्हाण, नारायण पांचाळ, अंकुश गोळवणकर, संजय नाईक यांच्यासह अन्य ग्रामपंचायतीचे सदस्य, पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. श्री. राणे म्हणाले, राणे यांची आम्हाला शिकवण आहे, निवडणूकीत जिंकणाऱ्या व्यक्तींचे अभिनंदन करण्याबरोबरच ज्यांचा पराभव झाला त्यांना कधीही एकटे टाकायचे नसते. त्यामुळे आडवली मालडी ग्रामपंचायत गेली म्हणून येथील कार्यकर्त्यांना सांभाळण्या बरोबरच या गावाला देखील आम्ही एकटे टाकणार नाही. ज्या गावात भाजपची सत्ता आली त्या गावांमध्ये ग्रामस्थांच्या विकासाच्या ज्या संकल्पना असतील त्याची यादी द्यावी. ग्रामपंचायतीच्या निवडणूकीमध्ये दिलेला शब्द आम्ही खाली पडू देणार नाही. राजकारण होत राहील, पण त्यातून ग्रामीण भागाला काही मिळणार नाही, निवडणूक संपली आता राजकारण संपले, हे प्रत्येकाने ध्यानात ठेवावे. आज जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भाजपने ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या आहेत. येथील आमदार, खासदार, पालकमंत्री शिवसेनेचा, मग मतदार भाजपला का निवडून देतात ? याचा विचार प्रत्येकाने करावा. हे सरकार विकासकामे करण्यात कमी पडल्याने लोकांमध्ये प्रचंड चीड आहे. त्यामुळे लोकांनाच हे सरकार पाडायचं आहे. जिल्ह्यात आता भ्रष्टाचार वाढला आहे. सत्ताधाऱ्यांनी जिल्हा मागे नेला हा जिल्हा पुढे नेण्यासाठी आपले प्रयत्न राहणार आहेत असेही त्यांनी सांगितले. आडवली – मालडी गावात यावेळी पराभव झाला असला तरीही यापुढे आपल्यालाच या गावचा विकास करायचा आहे. त्यामुळे पुढील निवडणूकी पूर्वी या गावातील विकास कामे १०० टक्के मार्गी लावण्याचा शब्द त्यांनी दिला. पाच ग्रामपंचायतीत भाजपला यश मिळाले आहे. त्यामुळे या गावांच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. श्री. तेली म्हणाले, २६ जानेवारीला जिल्ह्यात सुमारे ३०० उपोषणे झाली हे सत्ताधाऱ्यांचे अपयश आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यात सत्ताधारी अपयशी ठरल्याचे दिसून आले. याबाबतची चीड जनतेने ग्रामपंचायत निवडणुकीत काढत सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवून दिली. सत्ताधाऱ्यांच्या अपयशामुळे भाजपला मोठे यश मिळालं आहे. यापुढेही सर्व निवडणुकांमध्ये भाजपचीच सत्ता असेल. यासाठी सर्वांनी जोमाने कार्यरत राहावे.

You cannot copy content of this page