सिंधुदुर्गच्या खेळाडूंमधील टॅलेंटला वाव देणे गरजेचे

राजेश पवार;भारताचे डावखुरे फिरकी गोलंदाज राजेश पवार भजनात झाले दंग

⚡कणकवली ता.०४-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्रिकेट खेळाडूंमध्ये गुणवत्ता ठासून भरलेली आहे मात्र या गुणवत्तेला योग्य प्रशिक्षणाची गरज आहे. सिंधुदुर्गातून यापूर्वी अनेक दर्जेदार क्रिकेटपटू तयार झाले आणि भविष्यातही गुणवंत क्रिकेटपटू तयार होण्यासाठी मूलभूत सुविधा आणि पाठबळाची गरज आहे, या दोन्ही गोष्टी मिळाल्या तर सिंधुदुर्गच्या क्रिकेटचे भवितव्य उज्वल ठरेल. माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्रिकेट खेळाडूंसाठी आवश्यक ती मदत करण्यासाठी मी नेहमीच पुढाकार घेईन अशी ग्वाही भारताचे नामवंत डावखुरे फिरकी गोलंदाज आणि सध्याचे मुंबई संघाच्या अंडर 25 चे प्रशिक्षक राजेश पवार यांनी दिली.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आपल्या कणकवली तालुक्यातील हळवल गावी आलेल्या नामवंत फिरकीपटू राजेश पवार यांनी किर्लोस गावातील आपले मित्र यतीन राऊत व हेमंत राऊत यांच्या निवासस्थानी गणेश दर्शन घेतले. यावेळी किर्लोस भावेवाडी येथील ग्रामस्थांनी केलेल्या भजनात सामील होत भजनाचा आनंद लुटला. यावेळी श्री रामेश्वर भजन मंडळ किर्लोस भावेवाडी यांच्यातर्फे राजेश पवार यांचा सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ उद्योजक भजनी बुवा आत्माराम भावे व पंढरीनाथ भावे यांनी राजेश पवार यांचा सत्कार केला.
यावेळी राजेश पवार म्हणाले,मी सणांच्या निमित्ताने प्रत्येकवर्षी माझ्या कणकवली नजीकच्या हळवल -पवारवाडी या गावी येत असतो. गणेशोत्सव कधीच चुकवत नाही, त्यामुळे भजनाशी माझे जुने नाते आहे. किर्लोस भावेवाडीच्या भजनाबद्दल ऐकून होतो मात्र आज हे भजन ऐकून मंत्रमुग्ध झालो. अशाच प्रकारची संस्कृती जोपासली जात आहे हे खरोखरच कौतुकास्पद आहे असे सांगताना ते पुढे म्हणाले, क्रिकेट खेळाच्या माध्यमातून मला नावलौकिक मिळाला .आज इंडियन ऑइलमध्ये मी कार्यरत असून क्रिकेटसाठी योगदान देता आले हे मी भाग्य समजतो. भारताच्या दिग्गज खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मला प्राप्त झाली त्यामुळे क्रिकेट हा आमचा श्वास आहे. असे सांगतात ते पुढे म्हणाले ,सिंधुदुर्गच्या खेळाडूंमध्ये टॅलेंट आहे मात्र टॅलेंटला वाव देण्याची गरज आहे. लेदर बॉल क्रिकेट हा खेळ जरी काही प्रमाणात महागडा असला तरी यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे असे सांगताना वर्षातून काही दिवस सिंधुदुर्गात येऊन क्रिकेटचे धडे देण्यासाठी मी निश्चितपणे प्रयत्न करेन असेही ते म्हणाले.
राजेश पवार यांनी 1996 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तेव्हा वयाच्या 16 व्या वर्षी राजेश पवार यांना भारताचा पुढचा महान डावखुरा फिरकी आशा म्हणून ओळखले जात होते. त्याने मुंबई अंडर-19 संघाचे नेतृत्व केले आणि 1998 च्या ज्युनियर वर्ल्ड कपमध्ये तो भारतीय अंडर-19 संघाचा भाग होता, ज्यात मोहम्मद कैफ आणि हरभजन सिंग यांचा समावेश होता. 1999-00 च्या देशांतर्गत हंगामात त्याने 44 प्रथम-श्रेणी विकेट्स घेतल्या आणि राष्ट्रीय निवडीच्या अगदी जवळ आले. राजेश पवार यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खेळताना 84 सामन्यांमध्ये जवळपास 282 गडी बाद केले होते तर इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्स व दिल्ली संघातून आपल्या खेळाचे प्रदर्शन केले होते. त्याचप्रमाणे भारत विरुद्ध बांगलादेश कसोटी संघातील त्यांची निवड झाली होती. बडोदा संघातून झहीर खान याच्या समवेत भाग घेतला होता. सध्या मुंबई संघाच्या 25 वर्षाखालील संघाचे प्रशिक्षक म्हणून जबाबदारी पार पाडत असताना सचिन तेंडुलकर यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या रोड सेफ्टी सामन्यासाठीच्या संघात राजेश पवार यांची निवड करण्यात आली आहे. मुंबई वरळी येथे लहानपण गेल्यानंतर आता मुंबई प्रभादेवी येथे वास्तव्यास असलेले राजेश पवार हे आपल्या गावाशी नाळ जोडून आहेत. म्हणूनच प्रत्येक गणेशचतुर्थीला गणेशोत्सवासाठी ते नियमितपणे गावी येतात आणि भजनाचा आनंद लुटतात. कोकणाला नितांत सुंदर सौंदर्य लाभले आहे त्यात सिंधुदुर्ग जिल्हा हा अव्वल आहे. त्यामुळे माझ्या जिल्ह्याबद्दल आणि गावाबद्दल मला आदर आहे. येथून सर्वोत्तम खेळाडू घडावेत हीच आपली इच्छा असल्याचे राजेश पवार म्हणाले.

You cannot copy content of this page