*समितीने मंजूर केलेली कामे वगळण्याचा अधिकार पालकमंत्र्यांना आहे का..? : नारायण राणे

*सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीची सभा*

*💫सिंधूदुर्गनगरी दि.२८-:* जिल्हा नियोजन समिती मध्ये विरोधी सदस्यांनी सुचविलेली कामे वगळली जात असल्याच्या आरोपावरून ही सभा चांगलीच वादळी ठरली. समितीने मंजूर केलेली कामे वगळण्याचा अधिकार पालकमंत्र्यांना आहे का असा प्रश्न खा. नारायण राणे यांनी उपस्थित करत कामे वगळण्याच्या प्रक्रियेला आक्षेप घेतला. तसेच यावर विरोधी सदस्य व सत्ताधारी यांच्यात जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली. अखेर यापुढे कामे बदलली जाणार नसल्याचे सांगत या वादावर पालकमंत्री उदय सामंत यांनी पडदा टाकला. सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीची सभा तब्बल एक वर्षानंतर येथील नवीन जिल्हा नियोजन समिती सभागृहात सभाध्यक्ष तथा पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक, खासदार नारायण राणे, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, आमदार नितेश राणे, आमदार अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ हेमंत वसेकर, जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधवले, सदस्य रणजित देसाई, राजेंद्र म्हापसेकर, विष्णूदास कुबल, संजना सावंत, संजय पडते, सतीश सावंत, आदी अधिकारी उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीलाच विरोधी सदस्यांनी सुचविलेली कामे इतिवृत्तात बदलण्यात आली असल्याचा आरोप खुद्द खासदार नारायण राणे यांनी सभेत केला. तसेच या प्रक्रियेला आक्षेप घेत सभागृहाने मंजूर केलेलीं कामे परस्पर बदलण्याचा अधिकार पालकमंत्र्यांना आहे का ? असा प्रश्न खा. राणे यांनी सचिवांना विचारला. तसेच आपल्याकडून कामांच्या याद्या मागितल्या जातात परंतु त्या मंजूर केल्या जात नसल्याचे आम. नितेश राणे यांनी सभेत सांगितले. आमदार वैभव नाईक, पस सदस्य, वेंगुर्ला सभापती यांच्या शिफारशीनुसार कामे बदलण्यात आली असल्येचा आरोप सदस्य रणजित देसाई यांनी यावेळी केला. यावेळी आमदार वैभव नाईक यांनी सभेत स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. याला विरोधी सदस्यांनी विरोध केला. तसेच आम्ही पालकमंत्र्यांना प्रश्न केला आहे त्यांनी उत्तर द्यावे असे खा. राणे यांनी यावेळी सांगितले. यावरून सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. दरम्यान यापुढे सदस्यांनी सुचविलेली च कामे मंजूर केली जातील ती कोणत्याही परिस्थितीत बदलली जाणार नाहीत असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट करत वादावर पडदा टाकला. सदस्यांना देण्यात आलेल्या इतुवृत्तात खर्चाची आकडेवारी देण्यात आली होती. मात्र ही लाखात आहे की कोटी मध्ये याचा उल्लेख नव्हता याबाबत खा. राणे यांनी नियोजन अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. तसेच १४७ कोटी आरखड्या पैकी किती खर्च झाले याची माहिती देण्याची सूचना केली. समिती सदस्य आणि विशेष निमंत्रित सदस्यांना निधी देण्याच्या मुद्द्यावर चर्चा झाली असता सर्वांना आवश्यक तो निधी दिला जाईल असे पालकमंत्री उदय सामंत यांनी सभेत सांगितले. मात्र विशेष निमंत्रित सदस्यांना किती निधी दिला जाणार याची माहिती देण्याचा आग्रह विरोधी सदस्यांनी केला. यावर निमंत्रित सदस्या जान्हवी सावंत यांनी आपण मागील टर्म मध्ये आपल्याला नियमित सदस्य असतानाही कमी निधी दिला गेला असल्याचे सांगितले. यावरून पुन्हा एकदा सभागृहात विरोधी व सत्ताधारी सदस्यांत जोरदार खडाजंगी झाली. मात्र सदस्यांना ३० ते ३५ लाख रुपयांचा निधी दिला जाईल असे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. तिलारी प्रकल्पाअंतर्गत कालवे बांधण्यासाठी केंद्र शासनाकडून ४५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. त्यातून कालव्यांची कामे सुरू आहेत. मात्र ही कामे निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप राजेंद्र म्हापसेकर यांनी केला. याला खासदार विनायक राऊत यांनी सहमती दर्शवत या प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांची काम करण्याची मानसिकता नसल्याचे सांगितले. तसेच कालवा फुटला होता तेव्हा ही हे अधिकारी आले नसल्याचे सांगितले. यावर बोलताना तिलारी प्रकल्पावर चर्चा करायची झाल्यास एक दिवसही पुरणार नाही. अधिकारी कामे करत नाही तसेच कामाचे ठेकेदार हे विरोधी सदस्य असल्याचे विशेष निमंत्रित सदस्य बाबुराव धुरी यांनी सांगितले. यावर विरोधी सदस्य आक्रमक होत. ठेकेदार कोणाला म्हणतात असे सांगत बाबुराव धुरी यांना धारेवर धरले. दरम्यान आ. नितेश राणे यांनी धुरी यांना खाली बसण्यास सांगितले. यावर खासदार राऊत यांनी आमदारांचा आम्ही आदर करतो याचा अर्थ असा नाही की आमदारांनी धुरी यांनी खाली बस असे सांगणे योग्य नाही असे सांगितले. यावरही काही काळ वातावरण गरम झाले होते.

You cannot copy content of this page