दुर्गंधीमुळे आरोग्याचा प्रश्न_
*💫बांदा दि.२२-:* मडुरा बाबरवाडी येथील एका ग्रामस्थाचा बैल मृत्यू होऊन तीन दिवसांचा कालावधी उलटला आहे. बैलाची विल्हेवाट लावण्यासाठी वाडीतील अन्य ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनास दोन दिवसांपूर्वी लेखी अर्ज देऊनही अद्याप कोणतीही कार्यवाही केली नसल्याने बाबरवाडीतील ग्रामस्थांनी आरोग्यासाठी ग्रामपंचायतवर धडक दिली. परंतु सरपंच उपस्थित नसल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले अन उपसरपंच विजय वालावलकर यांना धारेवर धरले. बाबरवाडीतील ग्रामस्थ, अरविंद धुरी, प्रविण धुरी, राजाराम धुरी, चंद्रकांत धुरी यांच्यासह वीस ग्रामस्थांनी सह्या केलेले निवेदन पुन्हा एकदा ग्रामपंचायतला दिले. भरवस्तीत सदर मृत बैल असून आजूबाजूला तीन पाण्याच्या विहिरी आहेत. बैल मालक व ग्रामपंचायत प्रशासनास कळवूनही त्या बैलाची विल्हेवाट लावली नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाड्यात दुर्गंधी वाढत असून ग्रामस्थांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रशासनाने यावर तात्काळ निर्णय घेऊन ग्रामस्थांचे आरोग्य वाचवावे असे, अर्जात म्हटले आहे. मृत बैलापासून मानवी जीवनास धोका उदभवू नये याकरिता प्राथमिक आरोग्य केंद्र बांदा यांच्याकडून सदर बैल मालकास त्या मृत बैलाची विल्हेवाट लावण्यासंदर्भात मडुरा ग्रामपंचायतला लेखी कळविले आहे. उशिरापर्यंत त्या मृत बैलाच्या विल्हेवाट लावण्यासाठी बाबरवाडीतील ग्रामस्थ मडुरा ग्रामपंचायतमध्ये तळ ठोकून बसले होते. ग्रामस्थांनी सदर अर्जाची प्रत सावंतवाडी तहसीलदार, बांदा आरोग्य विभाग यांना दिली असून बांदा पोलिसांना कल्पना दिल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. दरम्यान, मडुरा सरपंच साक्षी तोरसकर यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.
