*💫मालवण दि.२१-:* दोन दिवसांपूर्वी मालवण बेळणे कणकवली मार्गावरील मसुरे भोगलेवाडी तिठा येथे झालेल्या मोटारसायकल अपघातातील गंभीर जखमी किरण रामचंद्र कासले रा वडाचा पाट (वय ३२ वर्ष) याचे उपचारा दरम्यान बांबुळी गोवा येथे आज गुरुवारी दुपारी २ च्या सुमारास निधन झाले. वडाचापाट बौद्धवाडी येथील किरण रामचंद्र कासले हे दि १९ जानेवारी रोजी आपली मोटारसायकल ( एमएच ०७-एएई ३१२४) घेऊन मालवण ते वडाचापाट असा प्रवास करत होते. तीव्र स्वरूपाच्या उतारावर भोगलेवाडी तिठा येथे त्यांची मोटारसायकल घसरून मंगळवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास अपघात झाला होता. यावेळी किरण यांच्या डोक्याला मोठा मार लागल्याने ते रस्त्यातच पडले होते. त्यांच्या सोबत असलेला सहकाऱ्याला किरकोळ मार लागला होता. अपघाताची घटना समजताच बागायत येथील वीज वितरण कंपनीचे कर्मचारी स्वप्नील धामापूरकर, अमित बागवे, सूरज धामापूरकर तसेच ग्रामस्थांनी त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर अधिक उपचारासाठी प्रथम त्याला लाईफटाईम हॉस्पिटल व नंतर मंगळवारी रात्री बांबुळी- गोवा येथे दाखल केले होते. यावेळी जी प सदस्य अनिल कांदळकर, माजी सभापती राजेंद्र प्रभुदेसाई, दया देसाई तसेच वडाचापाट ग्रामस्थ यांनी तो वाचवा म्हणून उपचार मिळण्यासाठी पराकाष्ठा केली होती. परंतु डोक्याच्या कवटीला मोठा मार लागल्याने डॉक्टरांचे प्रयत्न असफल ठरले. किरण हा खाजगी वाहन चालक म्हणून काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. दोन वर्षा पूर्वीच त्याचा विवाह झाला होता. घरची परिस्थिती अत्यंत गरीब असल्याने कासले कुटुंबावर मोठा आघात बसला आहे.त्याच्या पश्चात पत्नी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.
वडाचापाट येथील किरण कासले यांचे उपचारादरम्यान निधन….
