अन्यायग्रस्त तुकाराम बांदकर यांचा इशारा
सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी रोहयो हजेरिपट सहाय्यक यांच्याकडून त्यांच्या नेमणुकीच्या निवडणुकीच्या कालावधीत कोणतेही काम करून घेण्यात आले नसल्याचा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तत्कालीन कार्यकारी अभियंता यांनी चुकीचा दाखला शासनाला दिल्याने आपले आयुष्य उद्ध्वस्त झाले असल्याचा आरोप अन्यायग्रस्त तुकाराम बांदकर यांनी केला आहे. तसेच प्रशासकीय कारभाराविरोधात २३ वर्षे लढा देऊनही शासन सेवेचा लाभ मिळालेला नसल्याने तो मिळावा यासाठी २६ जानेवारी रोजी उपोषण छेडणार असल्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे. तत्कालीन उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम उप देवगड यांनी १९ एप्रिल १९९३ आणि १९ मे १९९३ च्या आदेशाने १९ एप्रिल १९९३ ते १८ जुलै १९९३ या कालावधीसाठी आपली रोजगार हमी योजनेच्या किंजवडे ते बाईतवाडी रस्ता तयार करणे या कामावर हजेरीपट सहाय्यक पदी नियुक्ती केली होती. रोहयो हजेरीपट सहाय्यकाच्या कामाबरोबरच सार्वजनिक बांधकाम उपविभाग देवगड या शासकीय कार्यालयातील शासकीय कार्यालयीन वेळेत शासकीय कामे करून घेण्यात आल्याचे जिल्हाधिकारी व अन्य प्रशासकीय यंत्रणा यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. याबाबत पुरावेही सर्व शासकीय यांना यापूर्वीच देण्यात आले आहे दरम्यान वरिष्ठ स्तरावर अहवाल देताना तत्कालीन सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी बांधकर यांच्याकडून शासकीय कार्यालयातील अन्य कोणतेही काम करून घेण्यात आलेले नाही असा चुकीचा अहवाल सादर केला आहे त्यामुळे शासकीय नोकरी पासून गेली २३ वर्षे आपण वंचित राहिलो आहे प्रशासन याची दखल घ्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
