आमदार वैभव नाईक यांचा आरोप
⚡सावंतवाडी,ता.२७-: पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार दीपक केसरकर हे केवळ मंत्रीपदाच्या लालसेपोटी शिंदे गटात दाखल झाले आहेत.भले त्यांना मंत्रीपद मिळेल परंतु ते निष्ठावंत न राहता “गद्दार” म्हणून ओळखले जातील. निष्ठावंत शिवसैनिक त्यांना कधीही थारा देणार नाहीत, असा आरोप शिवसेना नेते आमदार वैभव नाईक यांनी केला.
ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, कोकण पर्यटन समितीचे उपाध्यक्ष संदेश पारकर, अतुल रावराणे, माजी जिल्हा परिषद सदस्य नागेंद्र परब, जानवी सावंत, जिल्हा बँक संचालक विद्या परब, तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, यशवंत परब, विक्रांत सावंत, चंद्रकांत कासार, शब्बीर मणियार, अपर्णा कोठावळे, गुणाजी गावडे, सागर नानोसकर उपस्थित होते.
नाईक पुढे म्हणाले, आपण आल्यामुळे शिवसेनेची मते वाढली, असे दीपक केसरकरा सांगत आहेत. परंतु ते शिवसेनेत नसताना या मतदार संघातून यापुर्वी दोन वेळा शिवसेनेचा आमदार होता.
उदय सामंत आणि केसरकर यांनी घेतलेली भूमिका शिवसैनिकांना पटलेली नसल्यामुळेच आजचा हा मोर्चा होता. परंतु या ठिकाणी केसरकर आमच्या नेत्यांवर टोकाची टिका करीत असतील तर त्यांना त्याच पध्दतीने उत्तर दिले जाईल, असेही नाईक म्हणाले.आमदारांच्या फोडा-फोडी मागे भाजपाचा हात आहे. परंतु काही झाले तरी आम्ही शिवसैनिक म्हणून भाजपा समोर झुकणार नाही, असा पक्ष नेतृत्वाचा आदेश आहे आणि तो आदेश आम्ही तंतोतंत पाळू. असेही नाईक यांनी सांगितले ळ.
