राष्ट्रवादीची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी;महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने आंदोलन छेडण्याचा इशारा
सिंधुदुर्गनगरी ता १७
ओबीसी समाजाचा एम्पेरिकल डेटा दारोदारी जावून गोळा करणे अपेक्षित असताना तसे न करता हा डेटा सोफ्टवेअरच्या माध्यमातून आडनावावरून संकलित केला जात आहे. त्यामुळे हा प्रकार तत्काळ थांबविण्यात यावा आणि ओबीसी समाजाचे होणारे नुकसान टाळावे. यासाठी हा डेटा तलाठी ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य आणि नगरसेवक यांच्यामार्फत गोळा करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. तसे न झाल्यास अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेमार्फत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शासनाने ओबीसींची माहिती संकलित करण्यासाठी मा. बांठीया यांच्या अध्यक्षतेखाली समर्पित आयोग गठित केला आहे. या आयोगामार्फत सर्वोच्च न्यायालयास अपेक्षित असलेला एम्पेरिकल डेटा दारोदार जाऊन ओबीसींची खरी आर्थिक, सामाजिक, राजकीय स्थितीची माहिती संकलित होणे अपेक्षित होती. मात्र आयोग वरील प्रमाणे माहिती संकलित न करता सॉफ्टवेअरद्वारे आडनावानुसार सदोष पद्धतीने माहिती संकलित करीत आहे, ही समस्त ओबीसी समाजाची फसवणूक आहे. सॉफ्टवेअरवर सामाजिक, राजकीय, आर्थिक परिस्थितीची माहिती जमा करणे म्हणजे ओबीसी समाजाचे भविष्यातील कायमस्वरूपी कधीही भरून न येणारे नुकसान होणार आहे. त्यामुळे समर्पित आयोगाद्वारा चुकीच्या पद्धतीने होणारे चुकीचे कामकाज तात्काळ थांबविण्यात यावे व तलाठी, ग्रामसेवक यांच्यामार्फत योग्य ती माहिती संकलित करून शासनामार्फत सर्वोच्च न्यायालयासमोर ठेवण्यात यावी.
तसेच यासाठी ग्रामपंचायत सदस्य व नगरसेवक यांचीही मदत घेण्यात यावी. सखोल पद्धतीने ओबीसी समाजाची इम्परीकल डाटा कोर्टासमोर येण्यासाठी आपल्या स्तरावरून कार्यवाही व्हावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. तसे न झाल्यास अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेमार्फत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर, बाळ कणयाळकर, सुनील भोगटे, बाबा मेस्त्री, शंकर चिंदरकर आदी उपस्थित होते.
