वॉर्ड ३ अ अनुसूचित जातीसाठी आरक्षित

उर्वरित १९ पैकी १० जागा सर्वसाधारण महिलांसाठी

मालवण दि प्रतिनिधी

आगामी मालवण नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मालवण शहरातील नव्या प्रभाग रचनेनुसार १० प्रभागांमधील प्रत्येकी दोन अशा एकूण २० जागांसाठी काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीत लोकसंख्येच्या निकषानुसार शहरातील वॉर्ड क्र. ३ “अ” हा अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाला आहे. तर १९ पैकी १० जागा या सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. उर्वरीत ९ जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुल्या झाल्या आहेत.

मालवण नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी १० प्रभागातील २० जागांसाठी आरक्षण सोडत आज सोमवारी येथील मामा वरेरकर नाट्यगृहात काढण्यात आली. कुडाळच्या प्रांताधिकारी वंदना खरमाळे आणि मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्या उपस्थितीत ही आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली. यावेळी वेदिका सुभाष कुमठेकर हिच्या हस्ते चिठ्ठी काढून आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली.

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दहा प्रभागातील प्रत्येकी एक जागा ही महिलांसाठी आरक्षित असल्याने प्रांताधिकारी वंदना खरमाळे यांच्या सूचनेनुसार सर्वच प्रभागांसाठी अ आणि ब अशी यामधील एक चिठ्ठी काढून महिलांसाठी आरक्षित जागेचा वॉर्ड निश्चित करण्याचे ठरविण्यात आले. यास उपस्थितांनी सहमती दर्शवली. त्यानुसार काढलेली चिठ्ठी ही ब वॉर्ड ची आल्याने सर्व प्रभागातील ब वॉर्ड हा महिलांसाठी आरक्षित झाला.

तसेच प्रभाग क्रमांक तीन मध्ये अनुसूचित जाती जमाती या प्रवर्गातील व्यक्तींची वस्ती जास्त असल्याने या वॉर्ड मधील एक जागा अनुसुचितु जाती जमाती साठी यापूर्वीच आरक्षित करण्यात आलेली होती. ब वॉर्ड महिलांसाठी आरक्षित झाल्याने या प्रभागातील अ वॉर्ड ची जागा अनुसूचित जाती जमाती प्रवर्गसाठी आरक्षित झाली. तर इतर नऊ प्रभागातील अ वॉर्ड ची जागा सर्वसाधारण वर्गासाठी निश्चित झाली. त्यामुळे या जागांवर कोणत्याही प्रवर्गातील पुरुष किंवा महिला निवडणूक लढवू शकणार आहे.

यावेळी माजी नगराध्यक्ष महेश कांदळकर, माजी नगरसेवक, मंदार केणी, मनोज मोंडकर, पूजा करलकर, मंदार ओरसकर, अमेय देसाई, बाबी जोगी , महेंद्र म्हाडगुत, संमेश परब, महेश जावकर, पंकज सादये आदी व इतर उपस्थित होते.

You cannot copy content of this page