⚡वेंगुर्ला ता.१२-: वायंगणी-कोंडुरा येथील आमच्या सामाईक माड बागायती मध्ये कार्यकारी अभियंता महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था सिंधुदुर्ग व ठेकेदार क्षित्रय कंट्रक्शन कोल्हापूर यांनी बेकायदेशीर अतिक्रमण करून माड बागायतीच्या जमिनीचे नुकसान करत रस्त्याच्या व पुलाच्या नावाखाली विनापरवाना बेसुमार खोदाई करून मातीची चोरी केली असल्याने त्यांच्यावर शासनाच्या नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी कोंडुरा येथील प्रशांत पेडणेकर, नारायण पेडणेकर यांच्यासह अन्यायग्रस्त शेतक-यांनी वेंगुर्ला तहसीलदार यांना लेखी निवेदन सादर करून केली आहे.
सध्या कोंडुरा येथे सुरू असलेल्या खानोली-कोंडुरा ते येरम-लिंगाचे देवालय या रस्त्याचे काम कार्यकारी अभियंता महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था सिंधुदूर्ग यांचे मार्फत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सुरू असून या रस्त्याच्या नावाखाली अस्तित्वात नसलेल्या व ग्रामपंचायत दप्तरी नोंद नसलेल्या रस्त्याला रस्त्याचे स्वरुप देण्याकरिता आम्हा लोकांच्या माडबागायतीमध्ये कार्यकारी अभियंता महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था सिंधुदुर्ग व ठेकेदार क्षित्रय कंट्रक्शन कोल्हापूर यांनी करोडो रुपयांचा आर्थिक व्यवहार नजरेसमोर ठेवून बेकायदेशीर अतिक्रमण करत आमच्या सामायिक माड बागायतीच्या जमीन मिळकतीमध्ये विनापरवाना मातीची बेसुमार खोदाई करून माती चोरून नेली आहे. त्यामुळे माड बागायतीमध्ये झालेल्या मातीच्या बेसुमार खोदाईमुळे आमच्या माड बागायतीला आता सुरू होणा-या वादळी वा-यासह पावसाने धोका निर्माण झालेला आहे. तरी याबाबत आपण पत्यक्ष जागेवर पहाणी करून विनापरवाना झालेल्या मातीच्या बेसुमार चोरीबाबत व माडबागायतीला निर्माण झालेल्या धोक्याबाबत पहाणी करुन संबंधित दोषींवर कायदेशीर कारवाई करावी व आम्हा शेतक-यांना न्याय द्यावा, अशी मागणी कोंडूरा येथील अन्यायग्रस्त शेतक-यांनी वेंगुर्ल तहसीलदार यांचे जवळ लेखी निवेदन सादर करून केलेली आहे.
