⚡कणकवली ता.१२-: कणकवली सारख्या जिल्ह्याच्या मध्यवर्ती असलेल्या शहराच्या ठिकाणी राज्य शासनाच्या मिनी एमआयडीसीच्या जागेची आता विक्री होणार आहे. त्यासाठी १४ जून पर्यंत निविदा मागविण्यात आल्या आहेत. एकूण ७४.७१ गुंठे क्षेत्र असलेल्या या जागेची २ कोटी ८४ लाख रूपये किंमत निश्चित करण्यात आली आहे.
कोकण विकास महामंडळाच्या ताब्यात असलेल्या या लघु औद्योगिक वसाहतीमध्ये पुन्हा नव्याने उद्योग उभे राहतील व त्यामधून अनेक बेरोजगारांना रोजगाराची संधी मिळेल अशी आशा होती. मात्र कोकण विकास महामंडळच बंद करण्याचे निश्चित झाल्यानंतर आता या महामंडळाच्या अखत्यारीत असलेल्या जागांचीही विक्री केली जात आहे. यापूर्वी देखील ही जागा विक्रीचा प्रयत्न करण्यात आला मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे हा प्रयत्न अपयशी ठरला होता.
खासगी उद्योजकांच्या माध्यमातून नवनवीन उद्योगांची उभारणी व्हावी आणि रोजगार निर्मिती व्हावी यासाठी १९७७ मध्ये कोकण विकास महामंडळाने कणकवली शहरात बसस्थानकापासून अर्धा किलोमिटर अंतरावर गडनदी काठा लगत ७४.७१ गुंठे जागा संपादीत केली होती. त्यानंतर सन १९८० च्या सुमारास 17 औद्योगिक गाळे उभे करून ते उद्योजकांना देण्यात आले. या गाळ्यांमध्ये सुरवातीच्या काळात पावडर कंपनी तसेच घरगुती आणि विविध यंत्रांना लागणारे पार्ट तयार करण्याचे उद्योग सुरू होते. यातून शहर आणि परिसरातील अनेकांना रोजगार संधीही उपलब्ध झाली. मात्र कालांतराने हळूहळू येथील सर्व उद्योग बंद पडले. त्यानंतर या मिनी एमआयडीसीला केव्हा ऊर्जितावस्था मिळालीच नाही. तर कोकण विकास महामंडळाकडूनही या गाळ्यांच्या लिलावाबाबत हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे येथील मिनी औद्योगिक परिसर भकास होत गेला. तसेच गाळेही हळूहळू भूईसपाट झाले.दरम्यान जिल्ह्यात कासार्डे, आडाळी येथे नव्याने एमआयडीसी होण्याबाबत हालचाली सुरू असताना कणकवलीतीलही मिनी एमआयडीसी सुरू होण्याची प्रतीक्षा अनेक बेरोजगारांना होती. मात्र शासन पातळीवरून कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत. राज्य शासनाने तोट्यात असलेली महामंडळे बंद करण्याचे निश्चित केले आहे. यात कोकण विकास महामंडळ देखील लवकरच बंद केले जाणार आहे. त्यामुळे कोकण विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी मंडळाच्या ताब्यात असलेल्या ७४.७१ गुंठे क्षेत्राची विक्री प्रक्रिया सुरू केली आहे. 14 जून पर्यंत या जमिनी खरेदी करता ची निविदा भरता येणार आहे. मात्र त्याकरिता आरे दुग्ध वसाहतीच्या ठिकाणी असलेल्या कार्यालयात जाऊन निविदा फॉर्म खरेदी करावा लागणार आहे. या ठिकाणी असलेले 17 गाळयाची दुरावस्था झाली असून, या जागेवर असलेले कंपाउंड वॉल ची देखील पडझड झाली आहे. तसेच या ठिकाणी गार्डन साठी ठेवलेली जागा देखील आता अन्य खाजगी कामांकरिता वापरली जाऊ लागली आहे. कणकवली सारख्या जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर शासनाची असलेली जागा जर विक्री झाली तर या दरामध्ये येत्या काळात कणकवलीत एवढी जागा मिळणे फार कठीण आहे.
