धान्य विक्री केंद्रावरील ई पॉस मशीन तहसीलदारांच्या स्वाधीन…

ग्रामीण भागातील नेटवर्क सुविधेला कंटाळून मशीन दिल्या परत…

सावंतवाडी ता.०१: ग्रामीण भागात सक्षम नेट सुविधा उपलब्ध नसल्यामुळे ई पॉस मशीनद्वारे धान्य विक्री करताना येणाऱ्या अनेक अडचणी व इतर प्रलंबित समस्यांबाबत शासनाचे अनेक वेळा लक्ष वेधूनही कोणतीही ठोस कार्यवाही होत नाही त्यामुळे संतप्त रेशन धान्य दुकानदारांनी आज ई पॉस मशीन येथील तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्याकडे सुपूर्त केल्या यावेळी तब्बल 60 मशीन सुपूर्त करण्यात आल्या.

यावेळी येथील तालुका रेशन दुकानदार संघटनेने अध्यक्ष गणपत राणे, उपाध्यक्ष तन्वी परब, सचिव अमेय गावडे, खजिनदार अनिकेत रेडकर, सदस्य सोमनाथ परब, राघो परब, संतोष गावडे, संजय मळीक, शिवा लाड, सुरेश शेटवे, संगीता कोकरे अर्जुन सावंत आदी सावंतवाडी तालुक्यातील सर्व रेशन दुकानदार उपस्थित होते.

ई पॉस मशीनला दुकानांमध्ये नेटची सुविधा उपलब्ध करून देणे, या मशीनमधील डाटा सुधारून देणे पंतप्रधान गरीब धान्य योजना वितरण कमीशन मिळणे आदी रेशन दुकानदारांच्या प्रमुख मागण्या आहेत तसेच डिसेंबर २०२१ पासून ऑनलाईन वितरीत होऊ न शकलेले नियमीत व मोफत धान्य वितरणासाठी कॅरी फॉरवर्ड स्वरूपात ई पॉस मशीनवर उपलब्ध करून देने त्यामुळे दुकानदार आणि ग्राहक यांच्या मधील वादाचे प्रसंग कमी होतील तसेच कालबाह्य झालेल्या ई पॉस मशीनमुळे धान्य वितरणात नियमितता राहिलेली नसून मशीनला येणाऱ्या सततच्या तांत्रिक समस्यामुळे विशेषतः सर्व्हर डाऊन व आधार प्रमाणीकरण न होणे तसेच इतर धान्य वितरण योजनांच्या कामाच्या ताणामुळे ऑनलाईन वितरण वेळेत होत नाही.

या पॉस मशिनमुळे धान्य वितरण विस्कळीत होत असुन महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत ५० टक्केही धान्य वितरण होत नाही. काही ठिकाणी प्रत्यक्ष दुकानात धान्य उपलब्ध आहे. परंतू ई पॉस मशिनवर धान्य नाही तर काही ठिकाणी ई पॉस मशिनवर धान्य अपलोड केलेले दिसते. प्रत्यक्ष दुकानात धान्यच पोहचत नाही यामुळे ग्राहकांच्या रोषाला दुकानदारांना सामोरे जावे लागत आहे राज्यात अनेक ठिकाणी नेटच्या तांत्रिक समस्यामुळे धान्याचे ऑनलाईन वितरण निर्धारीत वेळेत पूर्ण होत नाही अशा अनेक समस्यांना रेशन दुकानदारांना सामोरे जावे लागत आहे

You cannot copy content of this page