*⚡कणकवली ता.१५-:* गेल्या पाच वर्षात आमच्या संचालक मंडळाने सर्व सभासदांना अभिप्रेत असा पारदर्शक कारभार केला असून या पाच वर्षात संस्थेची चांगली प्रगती झाली असल्यामुळे खारेपाटण सोसायटीवर भाजप प्रणित सहकार पॅनलचे पुन्हा एकदा निर्विवादपणे एक हाती सत्ता येईल अशा विश्वास खारेपाटण सोसायटीचे माजी संचालक, भाजपा खारेपाटण शक्ती केंद्रप्रमुख आणि सहकार पॅनेलचे प्रचारप्रमुख सूर्यकांत भालेकर यांनी व्यक्त केला आहे.28 डिसेंबर 2021 रोजी खारेपाटण गट विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या होऊ घातलेल्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सूर्यकांत भालेकर बोलत होते.
खारेपाटण सेवा सोसायटी ही संस्था खारेपाटण परिसरातील सहकार क्षेत्रातील शिखर संस्था असून सुमारे 65 वर्षांचा इतिहास असणाऱ्या या संस्थेला प्रगतीच्या शिखरावर नेण्याचे काम आमच्या विद्यमान संचालक मंडळाने केले आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांत कार्यक्षेत्र असणाऱ्या या संस्थेच्या सभासदांना अभिमान वाटेल अशी कामगिरी गत पाच वर्षात आमच्या संचालक मंडळाने केली आहे. संस्थेची स्वमालकीची प्रशस्त इमारत असावी असे संस्थेच्या प्रत्येक सभासदाचे स्वप्न होते. हे स्वप्न आमच्या संचालक मंडळाने सत्तेवर आल्यानंतर पूर्णत्वास नेले असून खारेपाटण शहराच्या वैभवात भर घालणारी भव्यदिव्य अशी संस्थेची स्वमालकीची इमारत आज दिमाखात उभी आहे. संस्थेचे भागभांडवल जवळपास एक कोटी पर्यंत नेण्यात संचालक मंडळ यशस्वी ठरले आहे. ऑडिट वर्ग अ संस्थेला सातत्याने मिळाला असून संस्थेच्या पारदर्शक कारभाराचे ते निदर्शक आहे. संस्थेमध्ये आज मुख्य विभाग, धान्य विभाग, खत विभाग, बियाणे विभाग आणि केटरिंग विभाग सुरू आहे.आमच्या संचालक मंडळाने प्रथमच केटरिंग विभाग सुरू करून ही सेवा अल्पदरात सर्वांना उपलब्ध करून दिली आहे. आमच्या कार्यकाळात संस्थेच्या निधी, ठेवी आणि कर्जामध्ये भरीव अशी वाढ झाली आहे. संस्थेच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांचा संस्थेच्या सभासदांना लाभ देण्याचा आमच्या संचालकांनी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. संस्थेचा संपूर्ण कारभार संगणकीकृत झाला आहे.
खारेपाटण सोसायटीच्या या आदर्शवत कारभारामुळे ए. एस. प्रतिष्ठान कोल्हापूर या प्रतिष्ठित संस्थेचा 2016 सालचा आदर्श सहकारी संस्था पुरस्कार, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा 2017 सालचा उत्कृष्ट सहकारी संस्था पुरस्कार, ए.एस. प्रतिष्ठान कोल्हापूर या संस्थेचा 2021 सालचा आदर्श संस्था, आदर्श चेअरमन, आदर्श सचिव पुरस्कार यांसह सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा 2021 सालचा उत्कृष्ट सहकारी संस्था कर्मचारी पुरस्कार संस्थेचे सचिव अतुल कर्ले यांना मिळाला.सभासदांमध्ये स्थानिक व बाहेरचे असा भेदभाव आमच्या संचालकांनी कधीही केला नाही. या सर्व बाबी लक्षात घेऊन पुन्हा एकदा या संस्थेची प्रगती अबाधित ठेवण्यासाठी आमच्या सहकार पॅनेलच्या सर्व उमेदवारांना निवडून देतील असा ठाम विश्वास सूर्यकांत भालेकर यांनी व्यक्त केला आहे.