“त्या” अनधिकृत ट्रॉलर मालकाला १लाख ३० हजार ४७५ रुपयांचा दंड

*अनधिकृत रित्या मासेमारी केल्याप्रकरणी तहसीलदार यांनी ठोठावला दंड*

मालवण दि प्रतिनिधी गेल्या आठवड्यात वेंगुर्ला येथील समुद्रात अनधिकृतरित्या पर्ससीनव्दारे मासेमारी करताना पकडण्यात आलेल्या रत्नागिरी येथील विश्वाइ ट्रॉलरच्या मालकाला वेंगुर्ला येथील तहसीलदारांनी १ लाख ३० हजार ४७५ रुपयांचा दंड ठोठावला आहे. मालवणचे सहाय्यक मस्य व्यवसाय आयुक्त श्री. नागनाथ भादुले यांच्या मार्गदर्शनाखाली परवाना अधिकारी मुरारी भालेकर यांच्या समवेत पोलीस कर्मचारी विश्वास पाटील, सागरी सुरक्षा परिवेक्षक दिपेश मायबा, सागर परब यांच्या पथकाने गेल्या शनिवारी पहाटे वेंगुर्ले बंदरासमोर वीस वाव समुद्रात अनधिकृत पणे मासेमारी करणारी नौका पकडली होती. ट्रॉलिंग परवाना रद्द असताना पर्ससीन जाळे वापरून मासेमारी करणारा रत्नागिरी येथील विश्वाई (IND -MH 1 MM 747) हा ट्रॉलर मत्स्य विभागाच्या पथकाने पकडून तो मालवण बंदरात अवरुद्ध करून ठेवला होता. या ट्रॉलरवरील मासळीचा लिलाव २६ हजार ९५ रुपये इतका झाला होता. याप्रकरणी मालवण तहसीलदारांकडे मत्स्य विभागाने सोमवारी प्रतिवेदन सादर केले. मालवण तहसीलदारांकडे झालेल्या सुनावणी वेळी संबंधित टॉलरवर वेंगुर्ले समोरील सागरी हद्दीत कारवाई केल्याने वेंगुर्ले तहसीलदारांकडे प्रतिवेदन सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार हे प्रतिवेदन वेंगुर्ला तहसीलदार यांच्याकडे सादर करण्यात आल्यावर वेंगुर्ला तहसीलदार यांनी या ट्रॉलरला अनधिकृतपणे मासेमारी केल्याप्रकरणी १ लाख ३० हजार ४७५ रुपयांचा दंड ठोठावला आहे.

You cannot copy content of this page