नगराध्यक्षावर टीका करून वराडकर यांनी आपली अकार्यक्षमता केली सिद्ध

*नगरसेवक यतीन खोत यांचा प्रसिद्धीपत्रकाद्वारे उपनगराध्यक्ष वराडकर यांच्यावर पलटवार*

*💫मालवण दि.२५-:* मालवण नगरपालिकेत मुख्याधिकारी, नगराध्यक्ष व प्रशासन एकाच नगरसेवकाचे ऐकतात, असे हतबलपणे सांगण्याची वेळ उपनगराध्यक्ष राजन वराडकर व गटनेते गणेश कुशे यांच्यावर आली. यातून त्यांनी स्वतःची अकार्यक्षमता स्वतःच सिद्ध केली आहे. केबिन मध्ये बसून केवळ ठेकेदारांची आणि नगरपालिकेत येणाऱ्या जाणाऱ्यांची मापे काढण्याचा एककलमी कार्यक्रम उपनगराध्यक्ष वराडकर यांनी ९ वर्षे केला असून स्वतःच्या प्रभागात कोणतेही विकास काम केलेले नाही. स्वतःच्या प्रभागात विकासाच्या नावाने बोंब असताना स्वतःचे ठेवावे झाकून आणि दुसऱ्याचे पाहावे वाकून अशी वृत्ती उपनगराध्यक्ष वराडकर यांची झाली आहे, अशी टीका नगरसेवक यतीन खोत यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. मालवणचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर हे एकाच नगरसेवकाच्या प्रभागात आपला विशेषाधिकार वापरून निधी खर्च करत आहेत अशी टीका उपनगराध्यक्ष राजन वराडकर व नगरसेवक गणेश कुशे यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर नगरसेवक यतीन खोत यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे वराडकर व कुशे यांच्यावर टीका केली आहे. उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांनी सत्ताधारी म्हणून ९ वर्षे खुर्चीला चिकटुन केवळ स्वतःच्या विकास केला. मात्र प्रभागाचा विकास करण्यात उपनगराध्यक्ष अपयशी ठरले. केवळ राजकारण करायचे, प्रेस घेऊन नगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांच्यावर आरोप करायचे. या व्यतिरिक्त शहरात स्वतः पुढकरून घेऊन उपनगराध्यक्ष यांनी कोणता विकास केला हे जाहीर करावे. नगराध्यक्ष यांच्यावर टीका करून आपण मोठे काम केले असे त्यांना वाटत असेल तर त्यांनी तो औट घटकेचा आनंद खुशाल घ्यावा. मात्र जनता सुज्ञ आहे ती सर्वकाही जाणते. हे ही तेवढेच लक्षात घ्यावे, असा टोला खोत यांनी लगावला आहे. एक वार्ड एक नगरसेवक हे बालिश व्यक्तव्य करून उपनगराध्यक्ष स्वतःचे अपयश वेशीवर टांगत आहेत. गेल्या चार वर्षात नगराध्यक्ष यांना विरोध करण्यापलीकडे उपनगराध्यक्ष यांनी कोणतेही काम केले नाही. उपनगराध्यक्ष यांनी स्वतःच्या प्रभागातही कामे केली नाही. त्याचा जाब नागरीक विचारत असल्याने आपले अपयश लपवण्यासाठी उपनगराध्यक्ष हे नगराध्यक्ष यांच्या नावाने बोंबा मारण्याचे काम करत आहेत. आपल्याच पक्षातील अन्य नगरसेवक सोबत नाहीत यावरून उपनगराध्यक्ष वराडकर व गणेश कुशे यांची कार्यक्षमता दिसून येते. प्रभागात बेपत्ता नगरसेवक अशी कुशे यांची ओळख आहे. अश्या व्यक्तीनी इतरांवर आरोप करताना मागील इतिहास पहावा अशी टीका खोत यांनी केली आहे. मालवण शहराच्या विकासासाठी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर नेहमीच प्रयत्नशील राहिले. शहरातील ९० टक्के रस्ते एकाचवेळी डांबरीकरण श्रेय त्यांचे आहे. अनेक कामे निविदा दरापेक्षा कमी किमतीत व दर्जेदार पद्धतीने करून घेत पालिकेचे हित जोपासण्याचे काम नगराध्यक्ष यांनी केले. बांधकाम सभापती म्हणून वर्षभर मालवण शहराची सेवा बजवताना नगराध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच प्रभागात समान न्याय देण्याचा प्रयत्न मीही केला. मात्र काही ठराविक कामांचे कागद दाखवून एकाच प्रभागाचा विकास झाला अश्या बोंबा उपनगराध्यक्ष व कुशे मारत आहेत, असेही यतीन खोत यांनी म्हटले आहे.

You cannot copy content of this page