कवयित्री सरिता पवार यांना राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार जाहीर
*⚡कणकवली ता.१९-:* राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेच्या वतीने दिला जाणारा पहिलाच राष्ट्रीय सावित्रीजोती पुरस्कार कवयित्री ललिता सबनीस आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांना जाहीर झाला आहे. त्यासोबतच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आघाडीच्या कवयित्री, कथाकार सरिता पवार यांना राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार जाहीर झाला आहे. सन्मानचिन्ह, मानपत्र व रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप आहे. सरिता पवार या मागील २२ वर्षे साहित्यलेखन करत आहेत. त्यांचे साहित्य राज्यातील अनेक प्रस्थापित मासिके तसेच दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेले आहे. सरिता पवार यांच्या अनेक कविता आणि कथांना अनेक राज्यस्तरीय, आंतरराज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. पेशाने प्राथमिक शिक्षिका असलेल्या सरिता पवार यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील अनुकरणीय कामगिरीची दखल घेत कुठल्याही प्रस्तावाशिवाय विविध संस्थांनी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आले आहे. अद्वैत फाउंडेशनच्या माध्यमातून साने गुरुजी यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रसेवादलाच्या माध्यमातून व्यक्तीमत्व विकास व संस्कार शिबीर सिंधुदुर्गात त्या आयोजित करतात. सिंधुदुर्गातील सध्याच्या साहित्य चळवळीत महत्त्वाचे योगदान देत असलेल्या समाज साहित्य संघटनेच्या सचिव म्हणून त्या काम पाहतात. तसेच सदाशिव पवार गुरुजी स्मृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक कार्यात त्या नेहमी अग्रेसर असतात. विविध सामाजिक संस्थांशी त्या सक्रियपणे जोडल्या गेलेल्या आहेत. श्रीमती पवार यांच्या साहित्य, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद पुणे आणि रयत शिक्षण संस्थेच्या औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या सहयोगाने त्यांना राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त येत्या २७ नोव्हेंबर रोजी श्रमिक पत्रकार भवन पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी कवयित्री सरिता पवार यांच्यासह राज्यभरातील विविध क्षेत्रातील कर्तव्यसंपन्न अशा एकूण १५ महिलांना राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार जाहीर झाला आहे. यांत मंदाकिनी रोकडे (पुणे), वैशाली मोहिते (पुणे), मधुराणी बनसोड (वाशीम), शिल्पा परुळेकर पै (वसई), अक्षदा देशपांडे (मुंबई), दीपिका सुतार (सिंधुदुर्ग), चंदना सोमाणी (पुणे), माधुरी चौधरी (औरंगाबाद), शरयू पवार (पुणे), जयश्री पाटकर (अमरावती), डॉ. नीलम जेजुरकर (राजगुरूनगर), डॉ. सुनीता खेडकर (पुणे), पौर्णिमा खांबेटे (पुणे), मनीषा शिंदे पाटील (पलूस, सांगली) यांचा समावेश आहे. या सोहळ्यात माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत, अशी माहिती साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांनी दिली. या सोहळ्याला डॉ. विजय ताम्हाणे, कवी चंद्रकांत वानखेडे, प्राचार्य डॉ. अरुण आंधळे, प्रा. डॉ. संजय नगरकर, प्रा. प्रशांत रोकडे उपस्थित राहणार आहेत. या प्रतिष्ठेच्या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल श्रीम. सरिता पवार यांचे समाजाच्या सर्वच थरातून अभिनंदन होत आहे.

