एकाच रस्त्यावर दोन योजनांतून निधी मंजूर

संभाव्य भ्रष्टाचार रोखण्यासाठी निधी खर्चाची प्रक्रिया थांबवावी;सामाजिक कार्यकर्ते योगेश तांडेल यांचे बेमुदत उपोषण सुरू

*⚡ओरोस ता.१५-:* खानोली कोंडुरा ते येरम लिंगाचे देवालय एकाच रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक व पर्यटन विकास योजनेतून घेण्यात आले आहे. त्यामुळे हा सरळ सरळ अपहार असून हा भ्रष्टाचार रोखण्यासाठी तात्काळ निधी खर्चाची प्रक्रिया थांबवावी, अशी मागणी हरिचरणगिरी – वायंगणी येथील सामाजिक कार्यकर्ते योगेश तांडेल यांनी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. मागणीची दखल न घेतल्याने त्यांनी १५ नोव्हेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. खानोली कोंडुरा ते येरम लिंगाचे देवालय हा जिल्हा परिषदेचा रस्ता असून यापूर्वी जिल्हा परिषदेने या रस्त्याचे खडीकरण डांबरीकरण केले आहे. या रस्त्याचे या पुढील मजबुतीकरण, खडीकरण व डांबरीकरण व्हावे, यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना व पर्यटन विकास योजना या दोन्ही योजनांमधून एकाच वेळी निधी खर्च करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पर्यटन विकास योजनेमधून २२ लाख ५१ हजार एवढ्या रकमेचा निधी मंजूर केला आणि त्याच रस्त्याला फक्त ४०० मीटर लांबी वाढवून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधून १ कोटी ७२ लाख ७८ हजार रुपये मंजूर केले आहेत. एवढ्या प्रचंड रकमेचा हा भ्रष्टाचार एकाच रस्त्यावर दोन योजनांमधून निधी खर्च करून केला जात आहे, असे योगेश तांडेल यांनी म्हटले आहे.

You cannot copy content of this page