१५ नोव्हेंबर पुर्वी रस्त्यावरील खड्डे बुजवा अन्यथा २० नोव्हेंबर रोजी रास्तारोको करणार

काळसे धामापूर ग्रामस्थांचा बांधकाम विभागास निर्वाणीचा इशारा.

*⚡मालवण ता.३०-:* नेरुरपार- कुडाळ या मार्गावर काळसे ग्रामपंचायतीसमोरील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून वाहनचालकांना मोठी कसरत करून आणि जीव मुठीत घेऊन ये- जा करावी लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे वारंवार लक्ष वेधुनही खड्डे बुजविले न गेल्याने तसेच लोकप्रतिनिधीही याकडे दुर्लक्ष करत असल्याने ग्रामस्थांच्या सहनशीलतेचा उद्रेक झाला असून १५ नोव्हेंबर पर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाने हे खड्डे न बुजविल्यास २० नोव्हेंबर रोजी काळसे ग्रामपंचायत समोरील रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा निर्वाणीचा इशारा काळसे- धामापूर गावातील ग्रामस्थानी सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदनाद्वारे दिला आहे. मालवण कुडाळ मार्गावर काळसे येथे ग्रामपंचायतीच्या समोरील रस्त्यावर पावसाळ्याच्या सुरुवातीलाच म्हणजे जून महिन्यात मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यातील काही खड्डे तर तब्बल एक फूट खोलीचे आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून वाहन चालवणे तसेच चालणे सुद्धा अवघड झाले आहे. सदर खड्डे पडून पाच महिने उलटून गेले तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने अथवा स्थानिक प्रशासनाने खड्डे बुजवले नाहीत. गणेश चतुर्थी झाली, दसरा झाला आणि आता दिवाळीही आली पण रस्त्यावरचे खड्डे मात्र तसेच आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून वाहतूक करताना वाहनचालक तसेच स्थानिक ग्रामस्थ त्रास सहन करत आहेत. या रस्त्यावरुन विनापरवाना ओव्हरलोड वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरची संख्याही लक्षणीय असून त्यावर महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाकडुन कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. स्थानिक राजकीय कार्यकर्तेही यावर आवाज उठवत नसल्याने ग्रामस्थांच्या सहनशीलतेचा उद्रेक झाला असून येत्या १५ नोव्हेंबर पुर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने काळसे धामापूर गावातील मुख्य रस्त्यावरील काळसे ग्रामपंचायतीसमोरील आणि इतर सर्व जीवघेणे खड्डे बुजवले नाहीत तर, २० नोव्हेंबर रोजी दोन्ही गावातील सर्वसामान्य नागरीक म्हणजेच राजकीय नेत्यांचे फक्त निवडणूकीवेळी लाडके असणारे मतदार रस्त्यावर उतरुन आंदोलन छेडत काळसे ग्रामपंचायत समोरील रस्त्यावर रास्ता रोको करणार आहेत. असा निर्वाणीचा इशारा काळसे धामापूर मधील ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिला आहे. खड्ड्यांमुळे कोणाचा अपघात झाल्यास कार्यकारी अभियंत्यांना जबाबदार धरले जाईल असाही ईशारा ग्रामस्थांनी दिला आहे, असेही ग्रामस्थानी म्हटले आहे. फोटो:-

You cannot copy content of this page