पद,प्रतिष्ठापेक्षा पुस्तके व्यक्तीला अनंत काळ जिवंत ठेवतात: प्रा.सोमनाथ कदम

कोर्ले येथे कवीवर्य आ. सो. शेवरे काव्य पुरस्कार वितरण सोहळा

*⚡कणकवली ता२७-:* समाजामध्ये पद, प्रतिष्ठा,पत व श्रीमंती याही पेक्षा पुस्तकातील विचार व त्या व्यक्तीने लिहिलेली पुस्तकेच माणसाला अनंत काळ समाजामध्ये जिवंत ठेवत असतात.” असे भावपूर्ण उदगार साहित्यिक व इतिहास संशोधक प्रा. सोमनाथ कदम यांनी कोर्ले ग्रामस्थ व एस के फाउंडेशन यांच्या सयूंक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या कोर्ले, ता.देवगड येथील पहिल्या कविवर्य आ सो शेवरे काव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात मार्गदर्शन करताना काढले. एस के फाउंडेशन चे प्रमुख व सामाजिक कार्यकर्ते श्री सचिन कोर्लेकर यांच्या अध्यक्षतेखाली सम्पन्न झालेल्या या कार्यक्रमाला कोर्ले गावचे सरपंच विश्वनाथ खानविलकर, विद्रोही साहित्य चळवळ सिंधुदुर्ग चे अध्यक्ष मधुकर मातोंडकर,कास्ट्राईब शिक्षक संघ सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अध्यक्ष किशोर कदम,प्रा. अच्युत देसाई, श्री.विनायक सापळे,आ सो शेवरे यांच्या पत्नी श्रीम.मायावती शेवरे,कोर्ले ग्रामसेवक श्री खोत,बौद्धजन सेवा संघ खारेपाटण विभागाचे बौद्धचार्य संतोष पाटणकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे एस के फाउंडेशन व कोर्ले ग्रामस्थ यांच्या वतीने शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कवी आ सो शेवरे यांच्या नावाने देण्यात येणाऱ्या ” कविवर्य आ सो शेवरे काव्य पुरस्कार ” चे पहिले वर्ष असून महाराष्ट्रातील एकूण ५४ नामवंत कवींनी आपले निवडक काव्य संग्रह परिषणसाठी पाठविले होते. तज्ञ परीक्षकांच्या समितीने परीक्षण केल्यानंतरच या वर्षीचा पहिला कविवर्य आ सो शेवरे काव्य पुरस्कार पुणे येथील प्रसिद्ध कवी – देवा झिंझाड यांच्या ‘ सगळं उलथवून टाकलं पाहिजे ‘ या काव्य संग्रहाला उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते देण्यात आला.रोख ३०००/- रुपये, शाल,श्रीफळ व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. ” कोकणातील परिवर्तनवादी दिवंगत कवी आ सो शेवरे यांच्या नावाने दिला जाणारा हा अतिशय मानाचा पुरस्कार मला जाहीर झाला हे मी माझे भाग्य समजतो.पुरस्कार देणारी संस्था किती लहान आहे.हे महत्वाचे नसून तर त्या संस्थेचा साहित्याकडे बघण्याचा दृष्टिकोण कीती विवेकी व चांगला आहे.हे महत्वाचे आहे.आपल्या सारख्या संस्थाच आमच्यासारख्या एखाद्या खेड्यातून आलेल्या कवीला मोठे करत असतात.”अशी प्रतिक्रिया पुरस्कार प्राप्त कवी – देवा झिंझाड यांनी पुरस्कार वितरण कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केली. -कार्यक्रमाचे अध्यक्ष व आयोजक तसेच एस के फाउंडेशन चे अध्यक्ष सचिन कोर्लेकर व कोर्ले गावचे सरपंच विश्वनाथ कोर्लेकर यांनी सयूंक्त रित्या कोर्ले गावचे सुपुत्र कविवर्य आ सो शेवरे यांचे ‘सुंदर स्मारक’ त्यांच्या जन्म गावी कोर्ले येथे उभारण्यात येणार असल्याची घोषणा केली. या आमच्या संकल्पनेला कोकणातील व महाराष्ट्रातील कवी साहित्यिक यांनी आर्थिक योगदान देऊन सहकार्य करण्याचे आवाहन देखील आयोजकांच्या वतीने यावेळी करण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. सोमनाथ कदम पुढे म्हणाले महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्रातील एक मोठं व्यक्तिमत्व म्हणून ‘आबा ‘ ची ओळख आहे. कोणत्याही गावाची उंची व प्रसिद्धी ही त्या गावातील प्रतिभावंत व बुद्धिवान माणसांमुळे होत असते.त्यामुळे कोर्ले गाव हे खऱ्या अर्थाने श्रीमंत झाले असल्याचे सांगितले. यावेळी साहित्यिक कवी मधुकर मातोंडकर व किशोर कदम यांनी देखील आपले विचार प्रकट केले. कर्यक्रमाचे प्रास्ताविक कोर्ले सरपंच विश्वानाथ खानविलकर यांनी केले.तर कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन व आभार सामाजिक कार्यकर्ते पत्रकार संतोष पाटणकर यांनी मानले.यावेळी कार्यक्रमाला कोर्ले ग्रामस्थ व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साहित्यप्रेमी उपस्थित होते.

You cannot copy content of this page