पांडुरंग लोंढे यांची वनविभागाकडे मागणी…
*⚡दोडामार्ग ता.२६ सुमित दळवी-:* दोडामार्ग मध्ये गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या जंगली गवारेडयांचा वन विभागाने तातडीने बंदोबस्त करावा, आता नुकसान भरपाई नको, पण बंदोबस्त करावा, अशी मागणी माजी ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग लोंढे यांनी केली आहे. गेल्या काही वर्षांपासून कोनाळ गावाला लागूनच असलेल्या जंगलात मोठ्या प्रमाणात जंगली गवारेड्यांचा कळप आहे. हे गवारेडे दिवसा रात्री शेतात तसेच अनेकांच्या काजू बागायतीमध्ये जाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत त्यामुळे जीवन जगणे कठीण झाले आहे. अगोदरच वाढती महागाई कोरोना संकटामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे, यात जंगली वन्य प्राणी त्रास देत आहेत. वन विभागाकडून पंचनाम केला जातो. अनेक कागदपत्रे जोडून नुकसान भरपाई प्रस्ताव सादर केला जातो, पण तुटपूंजी भरपाई ती देखील वेळेत मिळत नाही. त्यामुळे शेती बागायतीचा खर्च देखील निघत नाही, असे पांडुरंग लोंढे यांनी सांगितले. कोनाळ गावात एक दिवस न चुकवता जंगली गवारेडे गावात शिरकाव करून भातशेतीचे तसेच इतर पिकांचे नुकसान करत आहेत. त्यामुळे वन विभागाने जंगली गवारेड्यांचा बंदोबस्त करावा. नुकसान भरपाई नको पण यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी पांडुरंग लोंढे यांनी केली आहे.
