तासिका तत्त्वावरील शिक्षकांचा सहा वर्षे पगार नाही

शिक्षण सचिवांचे लक्ष वेधुनही दुर्लक्ष;भंडारी एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष विजय पाटकर यांचा आरोप

मालवण (प्रतिनिधी) मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कूल या प्रशालेत तासिका तत्वावर काम केलेल्या शिक्षकांना गेल्या सहा वर्षाचा ५० हजार रुपये एवढा पगार प्रस्ताव सादर करूनही मिळालेला नाही. तासिका तत्त्वावरील शिक्षकांना मिळणारा मेहेनताना तुटपुंजा असताना गेली सहा वर्षे त्यांना हा मोबदला मिळत नसल्यास या सुशिक्षितांनी करावे काय ? असा सवाल भंडारी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विजय पाटकर यांनी उपस्थित करीत तिसऱ्यांदा शिक्षण सचिवांचे लक्ष वेधले असून या तासिका तत्त्वावरील शिक्षकांचा थकीत पगार त्वरित देण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. तासिका तत्वावर काम करणाऱ्या शिक्षकांना शासनाकडून अगदीच तुटपुंज म्हणजेच एका तासिकेचे ७२ रुपये असा मोबदला देण्यात येतो. हे शिक्षक सुशिक्षित व उच्च विद्या विभूषित असूनही कमी मोबदल्यामुळे त्यांची ससेहोलपट होते. भंडारी हायस्कूलमध्ये तासिका तत्वावर काम केलेल्या चार शिक्षकांना गेले सहा वर्ष प्रस्ताव सादर करूनही मोबदला मिळालेला नाही. पगारासाठी त्यांना संस्थेकडे तसेच ओरोस येथे जिल्हा कार्यालयात पायपीट करावी लागत असेल तर ते कितपत योग्य आहे. सरकारी कर्मचारी लाखोंनी पगार घेत असतील त्याचवेळी हे शिक्षक तुटपुंजा पगारासाठी सरकारी कार्यालयात चक्रा मारत असतील तर सरकारी कर्मचारी नक्की काय काम करीत आहेत असा प्रश्न निर्माण झाला आहे. ओरोस येथे जिल्हा परिषद शिक्षण विभागातील वेतन विभागाकडे प्रस्ताव दाखल केल्यावर तो प्रस्ताव उपसंचालक कोल्हापूर यांच्याकडे पाठविला जातो. मात्र, यानंतर चौकशी केल्यावर शिक्षकांना ठराविक साच्याची उत्तरे दिली जातात. भंडारी हायस्कूलच्या या चार शिक्षकांची २०१५-१६ ते २०१९-२० या शैक्षणिक कालावधीतील एकूण ५० हजार १८४ रुपये एवढी पगाराची रक्कम शासन दरबारी प्रस्तावासहीत पडून आहे मात्र, ती देण्याबाबत कोणतीही कार्यवाही होत नाही, याला जबाबदार कोण ? असा सवाल विजय पाटकर यांनी उपस्थित केला आहे. तरी या प्रकरणी शिक्षण सचिवांनी लक्ष घालून तासिका तत्वावर काम करणाऱ्या शिक्षकांना त्वरित पगाराची रक्कम मिळवून देऊन न्याय द्यावा, जेणेकरून त्यांची दिवाळी आनंदात साजरी होईल, अशी मागणी विजय पाटकर यांनी केली आहे.

You cannot copy content of this page