महसूल विभागाची धडक कारवाईग्रामस्थानी वेधले होते;जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष
मालवण (प्रतिनिधी) मर्डे डांगमोडे गावातील गडनदीच्या खाडी पात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशा बाबत स्थानिक ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधतानाच या वाळू उपशावर कारवाई न झाल्यास डंपर फोडू असा आक्रमक इशारा दिला असताना या पार्श्वभूमीवर आज महसूल प्रशासनाने वाळू उपसा सुरू असलेल्या ठिकाणी धडक कारवाई करत जवळपास १० ते १२ रॅम्प उध्वस्त केले. मात्र केवळ रॅम्प तोडून डोळ्यांना पाणी लावण्याचे काम प्रशासनाने न करता वाळू उपसा करणाऱ्या बोटी जप्त करण्याची कारवाई केली तरच अवैध वाळू उपशाला चाप बसेल असे ग्रामस्थानी सांगत पुन्हा अवैध वाळू उपसा झाल्यास पुन्हा आक्रमक पवित्रा घेतला जाईल असा इशारा ग्रामस्थानी दिला आहे. मर्डे डांगमोडे येथील गड नदी खाडी पात्रात होत असलेल्या अवैध वाळू उपशामुळे स्थानिक ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून याबाबत कायदेशीर चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी शशांक ठाकूर व इतर ग्रामस्थानी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. त्याची दखल घेत सरपंच संदीप हडकर, तलाठी तुळशीसास गिरप यांच्यासह ग्रामविकास अधिकारी शंकर कोळसुलकर, ग्रा.प. सदस्य पूजा ठाकूर, क्लार्क विनोद मोरे आदींनी वाळू उपसा होणाऱ्या ठिकाणी अचानक भेट देत वाळू व्यावसायिक, व जमिनीच्या मालकांना समज दिली होती. यावेळी अवैध वाळू उपशावर कारवाई व्हावी अशी मागणी ग्रामस्थांनी करत कारवाई झाली नाही तर स्वतः वाळूचे डंपर फोडू असा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर आज शुक्रवारी मर्डे डांगमोडे येथे गडनदीच्या पात्रात वाळू उपसा होणाऱ्या ठिकाणी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत महसूल प्रशासनाकडून धडक कारवाई करण्यात आली. नदी काठावर उभारण्यात आलेले सुमारे १० ते १२ दगडी रॅम्प यावेळी जेसीबीच्या साहाय्याने उध्वस्त करण्यात आले. महसूल विभागाचे मंडळ अधिकारी एस. आर. चव्हाण, तलाठी तुळशीदास गिरप, पोलीस पाटील सोमा ठाकूर, कोतवाल संतोष चव्हाण यांच्या पथकाने पोलीस कॉन्स्टेबल विवेक फरांदे, पोलीस शिपाई संदीप सरकुंडे यांच्या बंदोबस्तात ही कारवाई केली. यावेळी ग्रामस्थ शशांक ठाकूर, किशोर ठाकूर, ओंकार ठाकूर, पंकज ठाकूर, झुबेर शेख, मयूर ठाकूर, इस्माईल, रुपेश वर्दम आदी उपस्थित होते. दरम्यान, अवैध वाळू उपशामुळे नदी पात्रात बोटींमधून होणारी तेल गळती व त्यामुळे होणारे प्रदूषण, वाळू कामगारांमुळे निर्माण होणारी अस्वच्छता व दुर्गंधी, वाळूच्या अवजड वाहतुकीमुळे रस्त्याची झालेली दुर्दशा अशा अनेक समस्यांना ग्रामस्थांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने केवळ रॅम्प उध्वस्त करून आमच्या डोळ्यांना पाणी लावू नये, वाळू उपसा बंद होण्यासाठी वाळू काढणाऱ्या बोटी व साहित्य जप्त करण्याची कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी ग्रामस्थानी केली आहे. तर वाळू उपशामुळे निसर्गाची होणारी हानी सहन केली जाणार नाही, पुन्हा अवैध वाळू उपसा सुरू झाल्यास आक्रमक पवित्रा घेऊन कारवाई केली जाईल असा इशारा शशांक ठाकूर यांनी दिला आहे.
