थाळ्या वाजवा, ढोल वाजवा म्हणणारे आता गप्प का?

शिवसेनेचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांचा केंद्र सरकारला सवाल;वेळप्रसंगी आंदोलन छेडण्याचा दिला इशारा

सावंतवाडी दि.२२ केंद्र व राज्य सरकारने कोविड नियमावलीत अनलॉक करूनही रेल्वेने मात्र अनलॉक केला नसल्याने ज्येष्ठ नागरिकांसह प्रवाशांची आर्थिक लूट होत आहे. थाळ्या वाजवा, ढोल वाजवा म्हणणारे आता गप्प कशासाठी असा प्रश्‍न शिवसेनेचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी उपस्थित करत केंद्र सरकार विरोधात वेळप्रसंगी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. कोरोना मुळे जग थांबले होते. त्यामुळे सर्व व्यवहारही ठप्प झाले होते. आता केंद्र व राज्य सरकार यांच्या निर्देशानुसार अनलॉक जाहीर होत आहे. मात्र या अनलाॅक मधून कोकण रेल्वे पूर्वपदावर आलेली नाही. प्रचंड महागाईमुळे लोक हैराण झाले असतानाच कोकण रेल्वे प्रवाशांची लूट करत आहे.कोविड काळात स्पेशल गाड्या सुरू करण्यात आल्या. आता अनलाॅक झाल्यावर स्पेशल गाड्या बंद करून पूर्वीसारखेच तिकीट दर आकारले जावे म्हणून वेळ प्रसंगी आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी दिला आहे. कोरोना मुळे कोकण रेल्वेच्या गाड्या बंद होत्या जसा कोविड प्रादुर्भाव कमी होत गेला तशा कोकण रेल्वेच्या गाड्या पूर्वपदावर येत होत्या यादरम्यान कोकण रेल्वेने स्पेशल गाड्या सोडल्या या गाड्यांच्या तिकिटाचा दर देखील महागडाच राहिला. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसह सुविधा असणाऱ्या सर्व नागरिकांना महागड्या तिकीटाचे आरक्षण करावे लागले त्यामुळे लोकांना आर्थिक भुर्दंड पडला आणि कोकण रेल्वेला मात्र त्याचा आर्थिक फायदा झाला असे रुपेश राऊळ यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारच्या आशिर्वादाने पेट्रोल डिझेलचे दर वाढल्याने महागाई प्रचंड वाढली आहे. या महागाईमुळे लोक आर्थिकदृष्टया होरपळून जात आहेत. कोकण रेल्वे देखील महागडे तिकीट आकारून प्रवाशांची, जेष्ठ नागरिकांची लूट करत आहे याकडे केंद्र सरकारने लक्ष द्यावे अशी मागणी आहे. ज्येष्ठ नागरिकांना सवलत दराने तिकीट मिळत होते तेही कोविड काळात बंद होऊन त्यांच्याकडूनही आर्थिक लुबाडणूक करण्यात आली आहे. आता तर केंद्र व राज्य सरकारने सर्वत्र अनलॉक सुरू केला आहे त्यामुळे कोकण रेल्वेने रेगुलर गाड्या सोडून तिकीट दर पूर्ववत करावा अशी मागणी आहे, असे रूपेश राऊळ यांनी सांगितले. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना थाळ्या वाजवा,ढोल वाजवा असे म्हणणारे मात्र रेल्वे किंवा कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी तिकीट दर पूर्ववत ठेवा. यासाठी कोणी ढोल वाजवा म्हणत नाहीत,असा टोला भाजपाला श्री. राऊळ यांनी लगावला. ज्येष्ठ नागरिकांची तिकिटाच्या माध्यमातून लूट होत असताना त्याकडे ढोल वाजवा म्हणणाऱ्यांचे लक्ष गेले नाही, असा टोला देखील त्यांनी हाणला. रेल्वे तिकीटामधुन लाखो रुपयांची लूट थांबविण्यासाठी कोकण रेल्वे पूर्वपदावर आणून रेगुलर गाड्या सोडाव्यात आणि तिकीट दर देखील पूर्ववत करावा अशी मागणी आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून करत आहोत,ती मान्य केली नाही तर आंदोलन छेडले जाईल, असे रुपेश राऊळ यांनी सांगितले. कोकण रेल्वे पूर्वपदावर यावी, सर्व गाड्या सोडाव्यात आणि स्पेशल तिकीट दर रद्द करावा अशी मागणी करण्यात येत आहे असे ते म्हणाले. रूपेश गुरुनाथ राऊळ तालुकाप्रमुख

You cannot copy content of this page