ग्रामस्थानीच श्रमदानातून बुजविले रस्त्याचे खड्डे

धामापूर ग्रामस्थाचा पुढाकार चौके-नेरूरपार रस्ता:वाहने चालविताना चालकांना करावी लागतेय कसरत

मालवण (प्रतिनिधी) चौके नेरुरपार कुडाळ या मुख्य रस्त्यावर अनेक खड्डे पडले असून रस्त्याची दुर्दशा झाली आहे. या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठी कसरत करून वाहने चालवावी लागत असल्याने अपघातही घडत आहेत. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग व शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने या मार्गावरील धामापूर येथे स्थानिक तरुणांनीच एकत्र येत रस्त्यावरील हे खड्डे श्रमदानातून बुजवले आहेत. चौके कुडाळ रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून गेले सहा महिने वाहनचालक या भल्यामोठ्या खड्ड्यामधूनच जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. खड्यांमुळे या रस्त्यावर वारंवार अपघात होत आहेत. दरवर्षी गणेश चतुर्थीपुर्वी बांधकाम विभागाचे कर्मचारी थोडेफार खड्डे बुजवतात पण यावर्षी तेही न बुजवल्यामुळे धामापूर ते नेरुरपार दरम्यान काही ठिकाणी भले मोठे व खोल असे धोकादायक खड्डे पडले आहेत. असे असताना ‘सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधीत राजकीय पुढारी मात्र याकडे दुर्लक्ष करत आहेत, असा या मार्गावरून जाणाऱ्यांचा व स्थानिक रहिवाशांचा आरोप आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे होणारे दुर्लक्ष लक्षात घेऊन धामापूर गावातील युवकांनी पुढाकार घेत स्वखर्चाने आणि श्रमदानातून धामापूर परबवाडी थांबा ते गवळदेव थांबा या दरम्यान मुख्य रस्त्यावर असलेले खड्डे बुजवले. त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. यामध्ये महेश परब, प्रशांत परब, दर्शन परब, राज परब, संदेश राऊळ, राजू गावडे, कैवल्य महाजन, शेखर मराठे या तरुणांनी सहभाग घेऊन श्रमदान केले.

You cannot copy content of this page