*⚡मालवण ता.१६-:* चंदिगड हरियाणा येथे होणाऱ्या टेबल टेनिस च्या राष्ट्रीय मानांकन स्पर्धेसाठी मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचा विद्यार्थी रजत रविकिरण तोरसकर याची निवड झाली आहे. दि. १८ ऑक्टोबर ते २२ ऑक्टोबर दरम्यान टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडिया आणि हरियाणा टेबल टेनिस असोसिएशन च्या वतीने ही राष्ट्रीय स्पर्धा होणार आहे. या निवडी बद्दल रजत याचे सर्वत्र कौतुक होत आहे. चंदीगड’हरियाणा, पंचकुला येथील तनु दास क्रीडाबसंकुलात होणाऱ्या या स्पर्धेत महाराष्ट्रातील १६ खेळाडूंची निवड झाली आहे. पुरुषांच्या खुल्या गटातील मुख्य स्पर्धेत कु.रजत तोरसकर यास वाइल्ड कार्ड प्रवेश मिळाला आहे. तसेच तो युवा गटामध्ये पात्रता फेरीत खेळणार आहे. नुकत्याच नाशिक येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस स्पर्धेमध्ये रजत याने उत्कृष्ट कामगिरी केली होती. शालेय स्तरावर रजत याने मालवण येथील कोरगावकर टेबल टेनिस अकॅडमी येथे प्रशिक्षण घेतले होते. मालवण मधील अ. शि.दे. टोपीवाला हायस्कूलचा माजी विद्यार्थी असलेल्या रजत ने राष्ट्रीय स्पर्धेतील अनुभवाचा फायदा जिल्ह्यातील खेळाडूंना करून देणार असल्याचे सांगितले. रजत याला महा सिंधू टेबल टेनिस ओसीएशन, सिंधुदुर्गचे अध्यक्ष श्री.विष्णु कोरगावकर तसेच श्री.हेमंत वालकर व सर्व पदाधिकारी यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले आहे. राष्ट्रीय टेबल टेनिस मानांकन स्पर्धेसाठी आता पर्यंत खुल्या गटामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातून निवड होणाऱ्या मोजक्या खेळाडूमध्ये रजत याचा समावेश झाल्याने सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्वला सामंत आणि कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष श्री. बाळासाहेब पंतवालावलकर यांनी त्याला प्रोत्साहन देत अभिनंदन केले आहे. संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनीही रजत चे अभिनंदन केले आहे.
रजत तोरसकर याची टेबल टेनिस राष्ट्रीय मानांकन स्पर्धेसाठी निवड
