तात्पुरती डागडुजी न करता पूर्ण खडीकरण व डांबरीकरण करण्याची मागणी
*💫बांदा दि.२१-:* बांदा-शिरोडा आणि सावंतवाडी-आरोंदा मार्गावर आरोस-दांडेली येथील अन्य ठिकाणासह विद्या विहार हायस्कूल समोर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. गाडी हाकताना वाहनचालकांना खड्यातुन ये जा करावी लागत असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या मार्गावरील खड्डयांची समस्या कायमस्वरूपी मार्गी लावावी अशी मागणी होत आहे. गेली काही वर्षे या मार्गावरील रस्त्याकडे शासनाकडून दुर्लक्षच करण्यात आले आहे. तालुक्यातील आरोस- दांडेली येथील विद्या विहार इंग्लिश स्कूल हायस्कूल समोर रस्त्यावर भलेमोठे खड्डे निर्माण झाले असून गाडी हाकताना वाहनधारकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. गेले काही वर्षे याठिकाणी खड्डे कायमस्वरूपी असून रस्त्याचे डांबर पूर्णतः उखडले असल्याने हा रस्ता तांबड्या रंगाचा दिसून येत आहे. पावसाळ्यामध्ये याच ठिकाणी पाणी साचल्याने तळ्याचे स्वरूप येते. त्याच मार्गातून पादचारी आणि वाहनधारक ये-जा करीत असतात. पावसाळा संपल्यानंतर या रस्त्याचे काम मार्गी लागणार अशी अपेक्षा व्यक्त होत होती. मात्र या रस्त्याच्या कामाकडे लक्ष देण्यात आले नाही. शिरोडा-बांदा या मार्गावरून तळवणे मार्गे आरोंदा या मार्गाने वाहनधारक ये-जा करतात. आरोदा आणि सातार्डा येथे जाण्यासाठी जवळचा आणि पर्यायी मार्ग म्हणून या रस्त्याकडे पाहिले जाते. त्यामुळे वेंगुर्ले किंवा पणजीच्या दिशेने जाणारे काही वाहनधारक याच मार्गावरून आपली वाहने हाकतात ; मात्र पाच ते सहा वर्षांपूर्वी सुस्थितीत असलेल्या या रस्त्याची वाईट अवस्था पाहावयास मिळत आहे. न्हावेली रेवटेवाडी ते कोडुरेपर्यंत सुमारे सात ते आठ किलोमीटरचा हा मार्ग असून ठिकाणी या रस्त्यावर फक्त खड्डेच दिसून येत आहेत. सावंतवाडी सातार्डा आरोस मार्गे जाणाऱ्या एसटी व इतर वाहनधारक याच मार्गावरून गाडी हाकतात. शिवाय दांडेली व आरोस या दोन्ही गावातील नागरिकांना या एकाच मार्गाचा उपयोग होतो. पणजी व सावंतवाडी या दिशेने ये-जा करताना करताना याच मार्गाचा वापर करावा लागतो. असे असतानाही जिल्हा परिषद बांधकाम विभागाने या रस्त्यावर तात्पुरती डागडुजी न करता या रस्त्याचे पावसाळ्यापूर्वी निदान नूतनीकरण करून हा मार्ग वाहनधारक व पादचारी यांना उपलब्ध करून द्यावा अशी मागणी होत आहे. ग्रामपंचायत प्रशासनानेही याबाबत पाठपुरावा करावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. पावसाळ्यापूर्वी या रस्त्याचे काम मार्गी लावण्याची मागणी सर्वस्तरातून होत आहे.
