‘घर तिथे शोषखड्डा ‘ योजनेअंतर्गत वैभववाडीत एकाच दिवशी १२५० शोषखड्डे

गटविकास अधिकारी जयप्रकाश परब यांची माहिती

*⚡वैभववाडी ता.२७-:* जलशक्ती अभियान 2021- 22 अंतर्गत ‘घर तिथे शोषखड्डा’ या योजनेच्या माध्यमातून वैभववाडी तालुक्यात एकाच दिवशी तब्बल 1250 शोषखड्डे मारण्याची किमया पंचायत समितीने साधली आहे. अशी माहिती गटविकास अधिकारी जयप्रकाश परब यांनी दिली आहे. या योजनेला गावागावात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. घरातील सांडपाणी व्यवस्थापन नीटनेटके करणे, ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. जनतेचा प्रतिसाद पाहता तालुक्यात लवकरच शंभर टक्के शोषखड्ड्याचे उद्दिष्ट पूर्ण होईल. असा विश्वास श्री जयप्रकाश परब यांनी व्यक्त केला आहे. ही मोहीम राबविण्यासाठी सहाय्यक गटविकास अधिकारी शशिकांत भरसट, गावातील सरपंच, लोकप्रतिनिधी, क्षत्रीय अधिकारी विशाल चौगुले, सुधाकर जाधव, लक्ष्मण हांडे, प्रकाश अडुळकर, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्हा परिषद आदर्श गाव योजनेच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. शोषखड्डा मारल्यानंतर त्या लाभार्थ्याला 2350 रुपये मिळणार आहेत. या योजनेसाठी कागदपत्रे जॉबकार्ड, आधारकार्ड, बँक पासबुक झेरॉक्स, असेसमेंट आवश्यक आहे. गटविकास अधिकारी जयप्रकाश परब यांच्या उपस्थितीत दोन दिवसापूर्वी पार पडलेल्या संयुक्त सभेत शोषखड्डा मारणेबाबत नियोजन करण्यात आले होते. या सभेला सरपंच, ग्रामसेवक व अधिकारी उपस्थित होते. नियोजनबद्ध कार्यपद्धतीमुळे एकाच दिवसात 1250 शोषखड्डे मारणे शक्य झाले आहे.

You cannot copy content of this page