बंधाऱ्यासाठी निधी देण्याचे आश्वासन देऊनही अद्याप पत्र नाही;मनसे प्रदेश सरचिटणीस उपरकर यांचा आरोप
मालवण दि प्रतिनिधी राज्यातील सत्ताधारी आणि देशातील सत्ताधारी हे दोघेही सामान्य जनतेला खोटी आश्वासने देऊन फसविण्याचे काम करत आहेत. तळाशील येथे कायमस्वरूपी बंधाऱ्यासाठी ग्रामस्थानी आंदोलन केले असताना आम. वैभव नाईक यांनी ५४ लाखांच्या तात्पुरती बंधाऱ्याची मलमपट्टी करताना बंधारा कामासाठी आणखी आमदार फंडातून २५ लाख व पालकमंत्र्यांमार्फत २५ लाख मंजूर करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र या २५ लाखांच्या निधीचे पत्र अद्यापही जिल्हा नियोजन मंडळाकडे गेलेले नाही. तर माजी खासदार निलेश राणे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून बांधाऱ्यासाठी दहा दिवसांत १० कोटी रुपये देण्याचे सांगितले होते. मात्र, ते १० कोटी रुपये देखील अद्याप आलेले नाहीत. त्या १० कोटींची आम्ही वाट पाहत असून ते १० कोटी रुपये केंद्रीय मंत्र्यांप्रमाणेच चिपळूणला अडकले की काय ? असा सवाल मनसेचे राज्य सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित करत सत्ताधाऱ्यांवर टीका केली. मालवण येथील शासकीय विश्रामगृह येथे मनसेचे राज्य सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी अमित इब्रामपुरकर, विल्सन गिरकर, सौ. भारती वाघ आदी व इतर उपस्थित होते. यावेळी परशुराम उपरकर म्हणाले, राज्यकर्त्यांनी जनतेला जेवढी आश्वासने देऊन फसवणूक केली, त्यांचा संग्रह मनसेने करून ठेवला आहे. तळाशील येथे ग्रामस्थांना खोटी आश्वासने देऊन आमदार वैभव नाईक निघून गेल्यावर जनतेने जो रोष व्यक्त केला त्याचा साक्षीदार आपण असल्याचे सांगत परशुराम उपरकर यांनी देवबाग ग्रामस्थानी जिओ ट्यूबला नकार दिला असतानाही आमदार, खासदार यांनी जिओ ट्यूब बंधाऱ्याच्या कामाचा शुभारंभ केला जिओ ट्यूबचा देवबागच्या किनाऱ्यावर उपयोग होणार नाही हे माहीत असतानाही आपली टक्केवारी मिळावी यासाठी सत्ताधाऱ्यांनी हे काम सुरू केल्याचा आरोप त्यांनी केला ते पुढे म्हणाले, देवबाग मधील या जिओ ट्यूब आज फुटून वाहून गेल्या असून समुद्राने मोबारवाडी येथील स्मशानभूमी गिळंकृत केली आहे. या कामाबाबत तक्रार देण्याचे काम आम. वैभव नाईक यांनी केले, मात्र नियमांची माहिती नसलेल्या व याबाबत जागरूक नसलेल्या आमदारांनी त्याचा कोणताही पाठपुरावा केलेला नाही. जिओ ट्यूबच्या दर्जा विषयी चाचणीची मागणी होत असताना ती चाचणीही करण्यात आली नाही. त्यामुळे या जिओ ट्यूबची चाचणी करून त्यावर झालेला खर्च ठेकेदाराकडून वसूल करून दगडी बंधाऱ्याच्या कामासाठी शासनाकडे जमा करावेत, मात्र तसे करण्याची आमदार नाईक यांच्यात हिंमत नसल्याची टीका श्री उपरकर यांनी केली
